नवी दिल्ली – संसदेचे विशेष अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. ५ दिवसीय अधिवेशनाचा पहिला दिवस जुन्या संसदेतील शेवटचा दिवस ठरणार आहे. उद्यापासून संसदेचे कामकाज नव्या इमारतीतून सुरू केले जाईल. संसदेच्या या भावनिक क्षणावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्याच्या संसद सभागृहाबद्दल अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी भाषणात पंतप्रधान मोदींनी पंडित नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचा विशेष उल्लेख केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पंडित नेहरू यांची प्रारंभिक मंत्रिपरिषद होती. बाबासाहेब आंबेडकर कायदेमंत्री होते. जगातील सर्वोत्तम संविधान निर्माण करण्यासाठी त्यांनी पाऊल उचलले. नेहरूंच्या कारकिर्दीत वॉटर पॉलिसी बनवण्यासाठी योगदान दिले. बाबासाहेबांनी सामाजिक न्यायासाठी सातत्याने प्रयत्न केले. लाल बहादुर शास्त्री यांनी १९६५ च्या युद्धात जवानांचे मनोबल याच सभागृहातून वाढवले होते. हरितक्रांतीसाठी याच सभागृहातून पहिले पाऊल उचलले. याच सभागृहात ग्रामीण विकास मंत्रालयाची स्थापना केली गेली. याच सभागृहात मतदानाचे वय १८ करण्यात आले. पंडित नेहरू, शास्त्री यांच्यापासून अटल बिहारी आणि मनमोहन सिंह यांच्यापर्यंत सर्वांनी देशाला नवीन दिशा दिली असं त्यांनी सांगितले.
तसेच आज सर्वांचे कौतुक करण्याची वेळ आहे. सर्वांनी या सभागृहाला समृद्ध करण्यासाठी आणि देशातील सामान्य नागरिकांचा आवाज उठवण्याचे काम केले. राजीव गांधी, इंदिरा गांधी यांना देशाने गमावले तेव्हा साश्रूनयनांनी श्रद्धांजली देताना याच सभागृहाने पाहिले. भारताच्या लोकशाहीत अनेक चढउतार पाहिले. हे सभागृह लोकशाहीची ताकद आहे. लोकशाहीचे केंद्रबिंदू हे सभागृह आहे. एका मताने याच सभागृहात सरकार कोसळले होते असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
संसदेवरील दहशतवादी हल्ल्याला कुणीही विसरू शकत नाही
संसदेच्या एकदा दहशतवादी हल्ला झाला, हा हल्ला संपूर्ण जगात एका इमारतीवर नव्हता, तर एक प्रकारे तो आपल्या आत्म्यावर हल्ला होता. ती घटना हा देश कधीही विसरू शकत नाही. पण आज ज्यांनी दहशतवाद्यांशी लढताना आपल्या सभागृहातील सदस्यांना वाचवण्यासाठी छातीवर गोळ्या झाडल्या त्यांनाही मी सलाम करतो. आज जेव्हा आपण या सदनातून बाहेर पडत आहोत, तेव्हा मला त्या पत्रकारांचीही आठवण करावीशी वाटते, ज्यांनी इथे वार्तांकन केले आहे, आतल्या बातम्या देण्याची त्यांची क्षमता होती आणि आत मधल्या आतच्या बातम्याही, त्यांचे कार्य विसरता येणार नाही. बातमीसाठी नव्हे, तर भारताच्या विकासाच्या प्रवासासाठी त्यांनी सर्वस्व खर्च केले, त्यांची आठवण ठेवण्याची वेळ आली आहे - इथल्या भिंतींची जशी ताकद आहे, तसाच आरसाही त्यांच्या लेखणीत आहे. आज हे सदन सोडणे हा अनेक पत्रकार बांधवांसाठी भावनिक क्षण असावा असंही मोदी यांनी सांगितले. आज आपल्याला इतिहास आणि भविष्य दोघांमधला दुवा बनण्याचं भाग्य मिळाले असंही त्यांनी आर्वजून सांगितले.