ऑनलाइि लोकमत
नवी दिल्ली, दि. ९ - लहान मुलांसह रेल्वेतून प्रवास करणा-यांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी भारतीय रेल्वे प्रशासनाने एक नवी योजना आणली असून त्याअंतर्गत आता रेल्वेमध्ये ५ ते १२ वयोगटातील मुलांसाठी 'खास मेन्यू' उपलब्ध करून दिला जाणार आहे. 'जननी योजना' असे या योजनेचे नाव असून त्यामध्ये काही निवडक स्थानकांवर बेबी फूड, गरम दूध, पाणी यासह लहान मुलांमध्ये लोकप्रिय असलेले बर्गर, पिझ्झा यासारखे खाद्यपदार्थही उपलब्ध असणार आहेत. दिल्ली, मुंबई सेंट्रल, नागपूर, पुणे, दिल्ली, हावडा, लखनऊसह २५ स्थानकांवर ही योजना सुरु करण्यात आली असून तेथे मुलांसाठी आवश्यक खाद्यपदार्थ उपलब्ध असतील याची काळजी रेल्वे प्रशासनातर्फे घेण्यात येणार आहे. लवकरच या स्थानकांची संख्या वाढवण्यात येईल असेही समजते.
रेल्वे स्थानक परिसरात आपल्या लहान मुलासाठी बेबी फूड व दूध न मिळाल्याची तक्रार एका महिलेने केली होती, त्यानंतरच ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी स्पष्ट केले.
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर कुल्हडमध्ये चहा मिळणार
मुंबईकरांसाठी एक खुशखबर म्हणजे मुंबई व पश्चिम रेल्वेच्या मुंबई डिव्हिजनमध्ये येणाऱ्या रेल्वे स्थानकांवर आता मातीच्या भांड्यात म्हणजेच कुल्हडमध्ये चहा मिळणार आहे. दुकानदारांच्या सोयीप्रमाणे कुल्हडमधील चहाची योजना सुरु होईल, असे समजते.