ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 13 - भारताचं संपुर्ण लक्ष चीनकडे असून त्यादृष्टीनेच आण्विक शस्त्राचं आधुनिकीकरण केलं जात असून आपल्या आण्विक धोरणातही बदल केले जात आहेत. याआधी भारताचं लक्ष पाकिस्तानकडे असायचं, जे चीनकडे वळलं आहे असा दावा अमेरिकेच्या दोन प्रसिद्ध आण्विक तज्ञांनी केला आहे. ऑनलाइन मॅगजीन "आफ्टर मिडनाईट"च्या जुलै-ऑगस्टच्या अंकात यासंबंधी लेख छापण्यात आला आहे. भारत एक अशी मिसाईल तयार करत आहे, ज्यामुळे दक्षिण भारतातून चीनवर हल्ला करण्यास मदत मिळेल असाही दावा या लेखात करण्यात आला आहे.
आणखी वाचा
"इंडियन न्युक्लिअर फोर्स 2017" शिर्षकाखाली लिहिण्यात आलेल्या आपल्या लेखात हॅन्स एम क्रिस्टिन्स आणि रॉबर्ट एक नॉरिस यांनी सांगितलं आहे की, "अंदाजानुसार भारताकडे जवळपास 150 ते 200 न्यूक्लिअर वॉरहेड तयार करण्यासाठी पुरेशा प्रमाणात प्लूटोनिअम उपलब्ध आहे. मात्र त्यांनी फक्त 120 ते 130 वॉरहेड तयार केले आहेत. दोन्ही तज्ञांनी दावा केला आहे की, नेहमी पाकिस्तानला लक्षात ठेवून तयार करण्यात येणारं भारताचं आण्विक धोरण आता चीनवर जास्त जोर देत आहे".
भारताने जवळपास 600 किलो प्लूटोनिअमची निर्मिती केली असून 150 ते 200 वॉरहेड तयार करण्यासाठी ते पुरेसं आहे. मात्र अद्यापपर्यंत सर्व प्लूटोनिअमचा वापर करण्यात आला नसल्याचंही लेखात सांगितलं आहे.
लेखात सांगण्यात आलं आहे की, आण्विक शस्त्र विकसित करण्यामागचा भारताचा मुख्य उद्देश म्हणजे पाकिस्तानपासून आपलं रक्षण करणं आहे. मात्र आता ज्याप्रकारे आण्विक शस्त्रांचं आधुनिकीकरण केलं जात आहे ते पाहता भारत भविष्यात चीनला लक्षात ठेवून वाटचाल करत आहे. तज्ञांनी दर्शवलेल्या अंदाजानुसार, भारताजवळ सात आण्विक शस्त्र उपलब्ध आहेत. यामधील विमानातून चालवली जाणारी दोन, जमिनीवरुन मारा करणारी चार तर समुद्रातून चालवली जाणारी एक बॅलिस्टीक मिसाईल आहे.
लेखात सांगण्यात आलं आहे की, किमान अजून चार प्रणालींवर काम केलं जात असून, वेगाने त्यांचं आधुनिकीकरण केलं जात आहे. लवकरच ही क्षेणणास्त्र भारत तैनात करेल असंही सांगण्यात आलं आहे.