ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 19 - सीमेवर पाकिस्तानी लष्कराच्या नापाक कारवायांना भारतीय लष्कराकडून जशास तसे प्रत्युत्तर मिळत असल्याने पाकिस्तानने आता सीमावर्ती भागात रहाणा-या नागरीकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून मोर्टरचा मारा सुरु झाल्यानंतर तीन शाळांमधली 217 विद्यार्थी आणि 15 शिक्षक इमारतीमध्ये अडकले होते. यावेळी पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने मोठया धाडसाने त्या सर्वांची सुखरुप सुटका केली.
नौशेरा सेक्टरमधील एका शाळेच्या इमारतीवर थेट मोर्टरचा मारा झाला पण सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. विद्यार्थी आणि शिक्षकांची सुखरुप सुटका करण्यासाठी पाच बुलेटप्रूफ गाडया आणि तीन बसेसची तैनाती करण्यात आली होती अशी माहिती राजौरी जिल्ह्याचे पोलीस आयुक्त डॉ. शकील इक्बाल चौधरी यांनी दिली. विद्यार्थी आणि शिक्षक जवळपास सहातासापासून अडकून पडले होते अशी माहिती अधिका-याने दिली.
आणखी वाचा
सैरमधील एका शाळेच्या इमारतीवर थेट मोर्टसचा मारा झाला पण या शाळेतील 55 विद्यार्थी आणि शिक्षक थोडक्यात बचावले असे चौधरींनी सांगितले. नौशेरा आणि मांजाकोटे सेक्टरमधील शाळा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्या आहेत.
पाकिस्तानच्या गोळीबारात दोन जवानांना वीरमरण, एक घुसखोर ठार
जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून होत असलेला गोळीबार मंगळवारीही चालू राहिला. पाकिस्तानच्या गोळीबारात भारताच्या दोन जवानांना वीरमरण आले, तर एक जवान जखमी झाला. तर भारतील लष्कराने केलेल्या गोळीबारात एक घुसखोर ठार झाला.
लष्तराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पाकव्याप्त काश्मीरमधील गुरेज विभागातून भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न लष्कराने हाणून पाडला. जवानांनी केलेल्या गोळीबारात एक घुसखोर ठार झाला. तसेच पाकिस्तानी सैनिकांनी राजौरी, पुंछ, कुपवाडा जिल्ह्यात अनेक ठिकाणी गोळीबार केला. लष्कराकडूनही त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले.
दरम्यान, पाकिस्तानच्या गोळीबारामुळे राजौरी जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका उत्पन्न झाला. तर राजौरीमधील नौशेरा विभागात लष्कराचा एक जवान शहीद झाला. जसप्रीत सिंह असे त्याचे नाव असून, तो पंजाबमधील राहणारा होता. तर नौगाम विभागातही एका जवानाला वीरमरण आले.