अधीर रंजन चौधरींच्या निलंबनाबाबत विशेष अधिकार समिती चर्चा करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 05:26 AM2023-08-15T05:26:58+5:302023-08-15T05:27:13+5:30
हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे पुढील चौकशी आणि अहवालासाठी पाठविण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभेत केलेल्या काही टिप्पणी आणि वर्तनासाठी त्यांना सभागृहातून निलंबित करण्याच्या प्रकरणावर संसदेची विशेषाधिकार समिती १८ ऑगस्ट रोजी विचार आणि चर्चा करील.
चौधरी यांचे हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे पुढील चौकशी आणि अहवालासाठी पाठविण्यात आले आहे. नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेली टिप्पणी व वर्तनामुळे चौधरी यांना १० ऑगस्ट रोजी लोकसभेतून निलंबित केले होते. संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभेत याबाबतचा प्रस्ताव मांडला होता, त्याला सभागृहाने आवाजी मतदानाने मंजुरी दिली. यापूर्वी काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या सदस्यांनी सभागृहातून सभात्याग केला होता.