ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 -दिवाळीचा आनंद देशातच नाही, तर जगात वास्तव्य करणारे भारतीय लुटत असतात. विदेशातील महाराष्ट्र आणि मराठी मंडळांमार्फत धूमधडाक्यात दिवाळी साजरी केली जाते. मात्र सिंगापूरमध्ये खुद्द प्रशासनाने पुढाकार घेत दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी विशेष ट्रेनची व्यवस्था केली आहे.
भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सिंगापूरमध्ये यंदा आगळीवेगळी ट्रेन धावणार आहे. येथे तमिळ ही चौथी अधिकृत भाषा म्हणून गणली जाते. त्यामुळे दीपावलीच्या थीमवर आधारित विशेष ट्रेन सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ही ट्रेन शहरातील विशेष यंत्रणेवर चालवली जाणार असून ईशान्येकडील प्रदेशांत धावेल. सिंगापूरमधील लिटील इंडिया स्टेशनवर ट्रेनला थांबा देण्यात आलेला आहे. परिणामी दिवाळीची मजा लुटण्यासाठी या भागात कंदील विक्रीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे लिटिल इंडियामधील मुख्य रस्तेही उजळून निघाले आहेत.
रंगीबेरंगी रांगोळ्या, कमळ आणि मोराची नक्षी असलेल्या पारंपरिक रचनांनी ट्रेनला सजवण्यात आले आहे. नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत ही ट्रेन धावणार आहे. सिंगापूरला अधिकाधिक पर्यटकांना भेट द्यावी, म्हणून प्रशासनाने ही शक्कल लढवली आहे. दिवाळीसोबतच सिंगापूरमध्ये वर्षभर विविध भारतीय सणही साजरे केले जाणार आहेत. दिव्यांच्या या सणामध्ये लिटील इंडियाच्या भागांतील रस्त्यारस्त्यांवर दिव्यांची आरास केली जाणार आहे. तसेच याठिकाणी दीपावली बाझार भरणार असून भारतीय फराळांची रेलचेलही असेल. (प्रतिनिधी)