ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज आपल्या निरोपाच्या भाषणात सर्वांचे आभार मानले. निरोपाचे भाषण देताना मुखर्जी यांनी आपल्या दीर्घ संसदीय कार्यकाळादरम्यान आलेले उतारचढाव, शिकवण आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधींपासून लालकृष्ण अडवाणी, सोनिया गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सर्व ज्येष्ठ नेत्यांचा उल्लेख केला. तसेच जाता जाता सभागृहातील गोंधळामुळे संसदेच्या वेळेच्या होत असलेल्या नुकसानीबाबतही चिंता व्यक्त केली.
निरोपाच्या भाषणात मुखर्जी म्हाणाले, संसदेने मला एक व्यक्ती म्हणून घडवले. लोकशाहीच्या या मंदिराता माझी रचना झाली. त्यामुळे निरोपाच्या वेळी मी काहीसा भावूक झालो आहे. 37 वर्षे मी राज्यसभा आणि लोकसभेचा सदस्य राहिलो. आज माझ्या निरोपासाठी शानदार कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल धन्यवाद. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या नेत्यांचे आभार. 22 जुलै 1969 रोजी मी राजसभेचा सदस्य म्हणून पहिल्या अधिवेशनात सहभागी झालो होतो. 2012 साली देशाचा 13 वा राष्ट्रपती म्हणून नियुक्त झाल्यावर हा प्रवास थांबला. मात्र माझ्या मनात संसदेबाबत असलेली ओढ कायम राहिली."
विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जीं यांचा कार्यकाळ उद्या म्हणजेच २४ जुलैच्या मध्यरात्री संपत आहे. नवनियुक्त रामनाथ कोविंद हे 25 जुलै रोजी राष्ट्रपतिपदाची शपथ घेणार आहेत. आता निवृत्तीनंतर प्रणव मुखर्जींना विविध सुविधा मिळणार आहेत.
प्रेसिडेंट इमॉल्युमेंट अॅक्ट १९५१ या कायद्यानुसार पूर्व राष्ट्रपतीला पूर्ण सन्मानानुसार राहण्यास सुसज्ज घर मिळते. त्याचबरोबर २ टेलिफोन, एक नॅशनल रोमिंग फ्री मोबाईल फोन, १ सेक्रेटरी आणि ४ खाजगी कर्मचारी, ऑफिस खर्चासाठी प्रत्येकी वर्षाला ६०,०००, एक कार आणि ७५ हजार रुपये (पूर्ण सॅलरीचे अर्धे) पेन्शन देण्यात येते. या सर्व सुविधा रिटायरमेंटनंतर प्रणव मुखर्जींना मिळणार आहेत. कायद्यानुसार वैद्यकीय सेवा तसेच पूर्ण देशात कुठेही फिरण्याची मोफत सुविधा पूर्व-राष्ट्रपतींना मिळते. रेल्वे, विमान, जहाज, इ. अशा देशभरात केलेल्या कोणत्याही प्रवासात राष्ट्रपतींना प्रथम श्रेणीत प्रवास करण्याची मुभा आहे.
१० राजाजी मार्ग या दिल्लीतल्या निवासस्थानी प्रणव मुखर्जी यापुढे राहणार आहेत. एकेकाळी या बंगल्यातच ए.पी.जे अब्दुल कलामजी राहत होते. या नव्या घरात प्रणव मुखर्जी आपला पूर्ण वेळ वाचन आणि लिखाण यात घालवणार आहेत. त्यांच्या पुढील जीवनासाठी या बंगल्यात पूर्ण व्यवस्था केली गेली आहे.