नवी दिल्ली : दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या देशातील सर्वात मोठ्या विमानवाहू जहाजाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती दिली जात आहे. ६५ हजार टन एवढ्या अवाढव्य वजनाच्या या जहाजाच्या इंधन प्रणालीवर सध्या विचार सुरू आहे. अधिकाधिक वापरासाठी आण्विक शक्तीच्या वापराचा पर्यायही निवडला जाऊ शकतो.आयएनएस विराट ही युद्धनौका आता ५६ वर्षांची झाली असून पुढील वर्षी निवृत्त होत आहे. या युद्धनौकेवरून संचलन होणारे हॅरिअर जम्प जेट ही केवळ ११ विमाने उरली आहेत. त्यामुळेच नौदलाने स्वदेशनिर्मित आयएसी- २ या जहाजाच्या निर्मितीसाठी विस्तृत अभ्यास चालविला आहे. आयएसी-२ या जहाजाचे नाव ‘आयएनएस विशाल’ असे राहणार असून त्याच्या निर्मितीसाठी १० ते १२ वर्षांचा कालावधी अपेक्षित असल्यामुळे भारताने या प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय घेतला आहे. चीनने भारतीय सागरी हद्दीत दीर्घपल्ल्याच्या आरमाराचा वापर वाढविल्याने या आवश्यकतेवर भर दिला जात आहे. आयएनएस विराटला निवृत्तीचे वेध ब्रिटनकडून मे १९८७ मध्ये खरेदी करण्यात आलेल्या आयएनएस विराटची आणखी आवृत्ती निर्माण करणे खर्चाच्या दृष्टीने परवडणारे नाही, असे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. फेब्रुवारी २०१६ मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर आढावा घेण्यात आल्यानंतर विराट निवृत्त होईल.(लोकमत न्यूज नेटवर्क)
सर्वात मोठ्या विमानवाहू जहाजाच्या निर्मितीला वेग
By admin | Published: February 23, 2015 11:03 PM