शीलेश शर्मा नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची दिल्लीतील १०,जनपथ येथील निवासस्थानी भेट घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याचे, सूत्रांचे म्हणणे आहे.
सोनिया गांधी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा झाल्यानंतर, पवार यांनी औपचारिकरीत्या घेतलेली त्यांची ही पहिली भेट आहे. जवळपास २० मिनिटे या दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये निवडणुकांबद्दल मंथन झाल्याचे समजते. आघाडीच्या जागावाटपाबद्दल अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नसला, तरी दोन्ही पक्षांमध्ये १२५-१२५ जागांबाबत सहमती झाल्याचे कळते. उर्वरित ३८ जागांवर अद्याप निर्णय बाकी आहे. या जागांपैकी काही जागा मित्रपक्षांना देण्याच्या बाजूने शरद पवार आहेत. मात्र, कोणत्या पक्षांना सोबत घ्यायचे आणि त्यांना किती जागा द्यायच्या, याचा काँग्रेसने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
दोन्ही पक्षांच्या भूमिका काय?काँग्रेस : लोकसभा निवडणुकांवेळी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये ज्या प्रमाणात जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला होता, त्याच धर्तीवर विधानसभेचेही जागावाटप निश्चित व्हावे, असे काँग्रेस नेत्याचे म्हणणे आहे.
राष्ट्रवादी : लोकसभा निवडणुकी राष्ट्रवादीचे प्रदर्शन काँग्रेसपेक्षा चांगले राहिले आहे. त्यामुळे विधानसभेच्या जागा वाढवून मिळायला हव्यात, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणणे आहे.