लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगली असतानाच हरियाणामध्ये राजकीय उलथापालथ होण्याचे संकेत मिळत आहेत. तीन अपक्ष आमदारांनी सरकारला असलेला पाठिंबा मागे घेतला असतानाच आता माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी राज्यपालांना पत्र लिहून विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावून बहुमत चाचणी घेण्याची मागणी केली आहे. तीन अपक्ष आमदारांनी पाठिंबा मागे घेतल्याने सरकार अल्पमतात आल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येत आहे.
माजी उपमुख्यमंत्री आणि जननायक जनता पार्टीचे नेते दुष्यंत चौटाला यांनी आम्ही सध्याच्या सरकारला पाठिंबा देत नसल्याचे सांगितले आहेत. तसेच हरियाणामध्ये दुसऱ्या कुठल्याही पक्षासोबत सरकार स्थापन करण्यास पाठिंब्यासाठी आमचे दरवाजे उघडे आहेत. दोन आमदारांच्या राजीनाम्यानंतर ९० सदस्यांच्या सभागृहातील सदस्यांची संख्या ८८ एवढी आहे. त्यात भाजपाकडे ४० आमदार आहेत. तर काँग्रेसकडे ३०, जेजेपीकडे ६, हलोपा आणि आयएलएलडीकडे प्रत्येकी १ आमदार आहे. त्यामुळे सरकारकडे बहुमताचा आकडा नाही आहे.
दुष्यंत चौटाला यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रातून मागणी केली की, तीन अपक्ष आमदारांनी सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला आहे. त्यामुळे विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावून सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्यात यावेत.