नवी दिल्ली: दक्षिण दिल्लीतील ग्रेटर कैलास एन्क्लेव येथे एक मोठा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. भरधाव वेगात असलेल्या बीएमडब्ल्यू कारने पार्किंग केलेल्या एका कारसह चार जणांना जोरदार धडक दिली. या अपघातात जखमी झालेल्या चौघांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण दिल्लीतील कैलास एन्क्लेव भागात पार्किंगला उभ्या केलेल्या एका मारुती सियाज कारला बीएमडब्ल्यू कारने जोरदार धडक दिली. ही धडक एवढी मोठी होती की, ती मारुती सियाज कार उलटली आणि फुटपाथावरून चालणाऱ्या चौघांना धडक बसली. या धडकेत चार जण जखमी झाले आहेत. या अपघातात यशवंत नलावडे (वय-५८), देवराज मधुकर (वय-५०), मनोहर (वय-६२) आणि नितीन कोल्हापुरे यांचा समावेश आहे. हे चौघे जण रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील रहिवासी असल्याची माहिती देण्यात आली आहे.
शतपावली करण्यासाठी बाहेर पडले अन् अपघात झाला
हे चौघे जण रात्री शतपावली करण्यासाठी बाहेर पडले होते. फुटपाथवरून चालत असताना सदर अपघात झाला. यानंतर तातडीने त्यांना एम्स रुग्णालयातील ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले, अशी माहिती पोलीस उपायुक्त चंदन चौधली यांनी दिली. एक महिला वेगाने बीएमडब्ल्यू कार चालवत होती. या बीएमडब्ल्यू कारने रस्त्याच्या कडेला पार्किंग केलेल्या मारुती सियाज कारला मागून धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, मारुती सियाझने उलटली आणि चार जणांना त्याची धडक बसली. यासंदर्भात एफआयआर दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. पुढील तपास सुरू आहे.