राजकीय पक्षांचा फेसबुक, गुगलवर प्रचारासाठी ५३ कोटी रुपये खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 04:34 AM2019-05-20T04:34:26+5:302019-05-20T04:34:46+5:30
भाजप सर्वांत पुढे : काँग्रेस, तृणमूल, आम आदमी पार्टीचाही समावेश
नवी दिल्ली : भारतातील राजकीय पक्षांनी फेब्रुवारीपासून आतापर्यंत फेसबुक व गुगल आदी डिजिटल माध्यमांत प्रचारासाठी ५३ कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च केला. यात देशातील सत्तारूढ भारतीय जनता पार्टीचा खर्च सर्वाधिक आहे.
भारतात १७ व्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या तारखांची घोषणा मार्चमध्ये करण्यात आली होती. त्यातील सातव्या व अखेरच्या टप्प्याचे मतदान रविवारी पार पडले व २३ मे रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.
फेसबुकच्या जाहिरातीशी संबंधित अहवालानुसार, यावर्षी फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून १५ मेपर्यंत १.२१ लाख राजकीय जाहिराती मिळाल्या. या जाहिरातींवर राजकीय पक्षांनी २६.५ कोटी रुपये खर्च केले.
सत्तारूढ भाजपने फेसबुकवरील २,५०० पेक्षा अधिक जाहिरातींवर ४.२३ कोटी रुपये खर्च केले. माय फर्स्ट व्होट फॉर मोदी, भारत के मन की बात, नेशन विथ नमो यासारख्या पेजनेही सोशल नेटवर्र्किं ग वेबसाईटवरील जाहिरातींवर चार कोटी रुपये खर्च केले. गुगलच्या व्यासपीठावर भाजपने १७ कोटी रुपये खर्च केले.
काँग्रेसने फेसबुकवरील ३,६८६ जाहिरातींवर १.४६ कोटी रुपये खर्च केले. तसेच गुगलवरील ४२५ जाहिरातींवर २.७१ कोटी रुपये खर्च केले.
फेसबुकने दिलेल्या आकडेवारीनुसार तृणमूल काँग्रेसने त्यांच्याकडील जाहिरातींसाठी २९.२८ लाख रुपये खर्च केले. आम आदमी पार्टीने फेसबुकवर १७६ जाहिराती चालवल्या व त्यासाठी १३.६२ लाख रुपये मोजले. त्याचप्रमाणे गुगलने दिलेल्या माहितीनुसार, आॅर्बन डिजिटल सॉल्युशन्स आपसाठी जाहिराती करत असून, त्याने १९ मेनंतर २.१८ कोटी रुपयांचे बिल दिले.
यूट्यूबवरही झळकल्या जाहिराती
याचप्रमाणे गुगल, यूट्यूब व त्याच्या सहायक कंपन्यांना १९ फेब्रुवारीपासून आतापर्यंतच्या १४,८३७ जाहिरातींवर राजकीय पक्षांनी २७.३६ कोटी रुपये खर्च केला.