शीलेश शर्मा
नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, त्या पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांची एसपीजी सुरक्षा केंद्र सरकारने काढून घेतली असून त्यांना आता झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. या निर्णयाविरोधात काँग्रेस आंदोलन करण्याच्या विचारात आहे.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचीही एसपीजी सुरक्षा काढून घेतली होती. मोदी सरकार सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. गांधी परिवारातून आलेल्या दोन पंतप्रधानांची दहशतवाद्यांनी हत्या केली. देशसेवेसाठी बलिदान देणाऱ्या गांधी परिवाराच्या सुरक्षेशी केंद्र सरकार खेळ करत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांनी केला. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, राजीव गांधी यांची सुरक्षा व्ही. पी. सिंग यांनी हटवून त्यांच्या आयुष्याशी खेळ केला, तसाच प्रकार मोदी सरकार गांधी परिवाराबाबत करीत आहेत. भाजपने म्हटले आहे की, सुरक्षा संदर्भातील निर्णय समिती घेत असते.