बनारस: स्पाईसजेटच्या विमानानं दिल्लीहून पाटण्याला जाणारे प्रवासी काही वेळ बनारसला अडकून पडल्याची घटना घडली. स्पाईसजेटच्या SG 8480 विमानानं दिल्लीहून पाटण्याला जाण्यासाठी उड्डाण केलं. मात्र खराब हवामानामुळे वैमानिकानं बनारसमध्ये विमान उतरवलं. यानंतर हवामान विमान उड्डाणास अनुकूल झालं. मात्र वैमानिकानं उड्डाण करण्यास नकार दिला. यासाठी वैमानिकानं ड्युटी संपल्याचं कारण दिल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. माझी ड्युटी संपली असल्यानं मी विमान उड्डाण करणार नाही, असं कारण वैमानिकानं दिल्याचा आरोप प्रवाशांनी केला. वैमानिकाच्या या पवित्र्यामुळे प्रवासी अडचणीत सापडले. या विमानानं गुरुवारी रात्री 8 वाजता दिल्लीहून पाटण्यासाठी उड्डाण केलं होतं. मात्र बनारसमधून विमान उड्डाण करण्यास नकार दिल्यानं गैरसोयी झाल्याची तक्रार अनेक प्रवाशांनी केली. विमान कंपनीकडून कोणतीही मदत न मिळाल्याचा आरोपदेखील प्रवाशांनी केला. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. गेल्या महिन्यात स्पाईसजेटच्या विमानातून धूर निघाल्याची घटना घडली होती. त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली होती. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. कोईबंतूरहून बंगळुरुला जाणाऱ्या विमानात हा प्रकार घडला होता.
पाटण्याला जाणारं विमान 'त्यानं' बनारसमध्ये उतरवलं अन् म्हणाला, माझी ड्युटी संपली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2018 7:10 PM