जयपूर : राजस्थानमधील जयपूर विमानतळावर स्पाइसजेट विमानाचे बुधवारी इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. दुबई-जयपूर एसजी-58 या विमानाचा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. यावेळी इमर्जन्सी लँडिंग करताना विमानाचा टायर फुटला. ही घटना सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे.
दुबई-जयपूर एसजी-58 विमानात 189 प्रवासी होते. हे सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. जयपूर विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्यानंतर विमानातील प्रवाशांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. तसेच, विमानतळावर सुरक्षा यंत्रणेकडून तपास सुरु आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात गो एअरच्या पाटणा- मुंबई विमानाचे औरंगाबादमधील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते. तांत्रिक बिघाडामुळे विमानाच्या दोन्ही इंजिनची गती मंदावली होती, त्यात विमानातील एसीही बंद पडल्याने प्रवाशांचा श्वास गुदमरत होता. यावेळी वैमानिकाने प्रसंगावधान राखत इमर्जन्सी लँडिंगचा निर्णय घेतला होता. या विमानात 165 प्रवासी होते.