नवी दिल्ली : स्पाइसजेट (Spicejet) या विमान कंपनीच्या यंत्रणेवर सायबर हल्ला झाला आहे. मंगळवारी रात्री स्पाइसजेट रॅन्समवेअर हल्ल्यात (Spicejet Ransomware Attack) कंपनीच्या अनेक कॅम्युटर्सला लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे बुधवारी सकाळी स्पाइसजेटची अनेक उड्डाणे उशिराने उड्डाण झाली. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले. दरम्यान, प्रवाशांनी स्पाइसजेटवर आरोप केला आहे की, फ्लाइटला उशीर झाल्याबद्दल त्यांना कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
स्पाइसजेटने बुधवारी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केले आणि कंपनीवरील या रॅन्समवेअर हल्ल्याची माहिती दिली. कंपनीने ट्विटमध्ये लिहिले की, "काल रात्री काही स्पाईसजेट सिस्टमला रॅन्समवेअर हल्ला झाला. त्यामुळे सकाळी उड्डाण करणाऱ्या विमानांच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. आमच्या आयटी टीमने परिस्थिती नियंत्रणात आणली आहे आणि यंत्रणा ठीक केली आहे. आता उड्डाणे सुरळीत सुरू झाली आहेत."
मनीकंट्रोल डॉट कॉमच्या रिपोर्टेसनुसार, अनेक प्रवाशांनी सोशल मीडियावर स्पाइसजेटच्या फ्लाइटच्या व्यत्ययाबद्दल तक्रार केली आहे. काही प्रवाशांचे म्हणणे आहे की, त्यांना विमानतळावर खूप वेळ थांबावे लागले, तर काहींचे म्हणणे आहे की ते बराच वेळ विमानात अडकले होते. याचबरोबर, या घटनेमुळे काहींनी आपली नाराजी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही व्यक्त केला आहे.
काय आहे रॅन्समवेअर?रॅन्समवेअर हल्ला हा सायबर हल्ला असतो. यामध्ये युजर्सचा कॅम्प्युटर ताब्यात घेऊन पैशांची मागणी केली जाते. रॅन्समवेअर युजर्सच्या माहितीशिवाय कॅम्प्युटर किंवा स्मार्टफोनचे नुकसान करणारे सॉफ्टवेअर डाउनलोड करते. याद्वारे सर्व डेटा हॅकरच्या ताब्यात जातो. हॅकर युजर्सचा डेटा ब्लॉक करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याचा प्रयत्न करतो.