SpiceJet Flight Turbulence: स्पाईसजेटच्या मुंबई-दुर्गापूर विमानाला रविवारी विमानतळावर लँडिंगदरम्यान तीव्र प्रतिकूल हवामानाचा (Flight Turbulence) सामना करावा लागला होता. त्यामुळे विमानातील किमान 12 प्रवासी जखमी झाले. जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, अपघातावेळी विमानात नेमकं काय झालं, त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
विमानाच्या आतील व्हिडिओ समोर आला दुर्गापूर विमानतळावर लँडिंगदरम्यान झालेल्या अपघातानंतर स्पाइसजेटच्या फ्लाइटमधील एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट स्पष्टपणे दिसत आहे. 42 सेकंदांचा हा व्हिडिओ फ्लाइटमधील एका प्रवाशाने शूट केला आहे. मात्र, हाच व्हिडीओ अपघाताचा बळी ठरलेल्या स्पाइसजेटच्या विमानातील आहे, याची पुष्टी अद्याप झालेली नाही.
विमानाच्या आत विखुरलेल्या अनेक गोष्टीव्हिडिओमध्ये स्पाइसजेटच्या फ्लाइटच्या फरशीवर कप, बाटल्या आणि इतर अनेक वस्तू पसरलेल्या दिसत आहेत. ऑक्सिजन मास्कदेखील लटकलेले असून केबिनचे सामानही प्रवाशांच्या अंगावर पडल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. यासोबतच एअरहोस्टेस प्रवाशांना धीर देण्याचा प्रयत्न करताना दिसतात.
स्पाईसजेटने या अपघाताबाबत निवेदन जारी केले आहेअपघातानंतर स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने सांगितले की, "1 मे रोजी, स्पाईसजेटचे बोईंग B737 विमान मुंबईवरुन दुर्गापूरला जात असताना खराब हवामानात फसले. यामुळे विमानातील काही प्रवासी जखमीदेखील झाले. विमान दुर्गापूरला उतरल्यानंतर त्या प्रवाशांना तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली.