Shri Shri Ravi Shankar Reaction On Ayodhya Ram Mandir:राम मंदिर रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या सोहळ्यापूर्वी प्राथमिक धार्मिक विधी, अनुष्ठान, पूजा-पाठ यांना सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील विविध क्षेत्रातील दिग्गज, मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. मात्र, देशातील चारही पीठांच्या शंकराचार्यांनी राम मंदिर सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे म्हटले आहे. शंकराचार्यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी प्रतिक्रिया देताना आक्षेप घेतला आहे.
सनातन धर्मानुसार मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरच तिथे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायला हवी. हा सोहळा सनातन धर्माच्या नियमांचे उल्लंघन करत आहे. त्यामुळे २२ जानेवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमाला चार शंकराचार्यांपैकी कोणीही उपस्थित राहणार नाहीत. आमच्या मनात कुणाच्याहीप्रति द्वेष नाही. परंतु, हिंदू धर्माचे नियम पाळणे आणि इतरांना तसे सुचवणे ही शंकराचार्यांची जबाबदारी आहे. अपूर्ण मंदिराचे उद्घाटन करून तिथे देवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणे हे चुकीचे आहे. आम्ही धर्मशास्त्राविरोधात जाऊ शकत नाही, असे अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी म्हटले आहे. यावर श्री श्री रविशंकर यांनी भाष्य केले.
नेमके काय म्हणालेत श्री श्री रविशंकर?
तुम्ही तिरुवन्नामलाई मंदिराचे उदाहरण घ्या. हे मंदिर जेव्हा बांधले तेव्हा खूप लहान होते. नंतर तिथे मोठे मंदिर उभारण्यात आले. मदुराईमधील मंदिरदेखील असेच एक उदाहरण आहे. आपल्या देशात अशी अनेक मंदिरे आहेत जी सुरुवातीला खूप लहान होती. परंतु, नंतर तिथे मोठी मंदिरे बांधण्यात आली किंवा त्यांचा जिर्णोद्धार केला गेला. एवढेच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध असलेले तिरुपती बालाजी मंदिर हेही सुरुवातीला खूप लहान होते. नंतरच्या काळात काही राजांनी तिथे मोठे मंदिर उभारले. प्राणप्रतिष्ठेनंतरही मंदिरे बांधण्याची तरतूद असते, असे श्री श्री रविशंकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, खरेतर आपल्याकडे राम मंदिराचे बांधकाम पूर्ण करून त्यानंतर तिथे प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी पुरेसा वेळ आहे. परंतु, आपण खूप घाई करत आहोत. परंतु, आम्ही स्वस्थ बसू शकत नाही. आम्ही या कार्यक्रमाला जाणार नसल्याने कदाचित या कार्यक्रमाचे आयोजनकर्ते आम्हाला मोदीविरोधी म्हणतील. मात्र आम्ही मोदीविरोधी नाही. परंतु, आम्ही आमच्या धर्मशास्त्राच्या विरोधात जाऊ शकत नाही, असे ज्योतिषपीठाच्या शंकराचार्यांनी म्हटले आहे. तर, सर्व काही धर्मग्रंथांतील पद्धतीप्रमाणे झाले पाहिजे. धर्मग्रंथांनुसार प्राणप्रतिष्ठा आणि भक्ती झाली नाही, तर सर्वत्र गोंधळ माजतो, असे स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी म्हटले होते.