हरियाणा विधानसभा निवडणुकीत फोगाट कुटुंब राजकीय चर्चेत आले आहे. बबिता फोगाटनंतर त्यांची चुलत बहिण आणि ओलिम्पियन विनेश फोगाट आणि दाजी बजरंग पुनिया यांनी राजकारणात एन्ट्री घेतली आहे. बबिता या दादरीहून भाजपाच्या आमदार आहेत. यावेळी त्यांना तिकीट नाकारण्यात आले. तर विनेश आणि बजरंग यांनी ६ सप्टेंबरला दिल्लीत काँग्रेस ज्वाईन केली. काँग्रेसनं विनेशला जींद जिल्ह्यातील जुलाना मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे तर बजरंग यांना संघटनेत किसान मोर्चाची जबाबदारी देण्यात आली आहे.
विनेश, बबिता, गीता, संगीता, प्रियंका आणि रितू या फोगाट कुटुंबातून येतात, ज्या कुटुंबातील सर्व ६ मुलींनी देशाचं नाव जगात अव्वल ठेवले आहे. विनेशचे गुरू महावीर फोगाट यांची कहाणी दंगल सिनेमात दाखवण्यात आली आहे. महावीर यांच्या कोचिंगमुळे ते भारत सरकारकडून द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित झाले आहेत. महावीर सिंग फोगाट यांच्या ४ मुली, गीता, बबिता, रितू आणि संगीता आहेत. महावीर यांनी प्रियंका आणि विनेश यांचा सांभाळ केला. विनेश यांनी त्यांचे वडील राजपाल यांना वयाच्या ९ व्यावर्षी गमावलं. महावीर फोगाट हे विनेशचे काका आहेत. विनेशचं २०१८ साली सोमवीर राठी यांच्याशी विवाह झाला. सोमवीर हेदेखील राष्ट्रीय पातळीवरील कुस्तीपटू आहेत.
महावीर फोगाट भवानी जिल्ह्यात बलाली गावात राहणारे आहेत. त्यांनी सर्व ६ मुलींना आपल्या गावातच कुस्तीचे धडे घेतले. ३ बहिणी गीता, बबिता, विनेश यांनी राष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धेत भाग घेतला आणि गोल्ड मेडलही जिंकलेत तर प्रियंका यांनी आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सिल्व्हर मेडल जिंकले. रितु यांनी राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकले. संगीता यांनी एज लेव्हलवर इंटरनॅशनल चॅम्पियनशिप मेडल जिंकले. संगीता यांचं लग्न रेसलर बजरंग पूनिया यांच्याशी झालं. बजरंग पूनिया हे फोगाट बहिणींचे दाजी आहेत.
विनेशच्या काँग्रेस प्रवेशानं कुटुंब नाराज
विनेश आणि बजरंगच्या काँग्रेस प्रवेशाने फोगाट कुटुंबात नाराजी पसरली आहे. याआधी महावीर फोगाट यांनी प्रतिक्रिया देत विनेशच्या राजकीय एन्ट्रीवर नाराजी व्यक्त केली. मंगळवारी भाजपा आमदार बबिता फोगाट यांनीही निवेदन दिले. या दोघांच्या प्रतिक्रियेमुळे फोगाट फॅमिलीत सर्वकाही ठीक नाही हे समोर आले आहे. राजकारणामुळे संपूर्ण कुटुंब अस्वस्थ झालं आहे. बबिता फोगाट यांनी काँग्रेस नेता भूपेंद्र हुड्डा यांनी आमच्या कुटुंबात फूट पाडली हे असं म्हटलं आहे.