भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात गेल्या काही महिन्यांपासून भारतातील दिग्गज कुस्तीपटूंचेआंदोलन सुरू आहे. मात्र या आंदोलनात फूट पडल्याचे दिसत आहेत. भाजप नेत्या आणि कुस्तीपटू बबीता फोगटने केलेल्या वक्तव्यानंतर कुस्तीपटू योगेश्वर दत्तनेही या आंदोलनावर टीका केली. त्या टीकेला आंदोलक कुस्तीपटू साक्षी मलिकने एक पत्र जारी करत प्रत्युत्तर दिले आहे.
महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने ट्विट करून हे पत्र सार्वजनिक केले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून आंदोलनात सहभागी झाल्यामुळे सराव करता आला नाही. त्यामुळेच आम्ही चाचण्या पुढे ढकलण्यासाठी हे पत्र लिहिले होते. आम्हाला या प्रकरणाचे गांभीर्य माहिती आहे, म्हणूनच आम्ही हे पत्र तुमच्यासोबत शेअर करत आहोत. काही शत्रू पैलवान आमच्या ऐक्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना यशस्वी होऊ देणार नाही, असे साक्षी म्हणाले.
साक्षीच्या पत्राक काय?
या पत्रात असे म्हटले आहे की, आंदोलनात सहभागी झाल्यामुळे काही कुस्तीपटूंना आशियाई खेळ 2023 आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप 2023 च्या चाचण्यांच्या तयारीसाठी थोडा वेळ हवा आहे. 10 ऑगस्टनंतर चाचण्या घेण्याची विनंती पत्रातून करण्यात आली आहे. या पत्राद्वारे विनेश फोगट, बजरंग पुनिया, साक्षी मलिक, सत्यव्रत कादियन, संगीत फोगट आणि जितेंद्र कुमार यांना चाचणीसाठी वेळ देण्यात यावा, अशी विनंती केली आहे.
नेमका वाद काय आहे?कुस्तीपटू योगेश्वर दत्तने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या चाचण्यांमध्ये आंदोलक कुस्तीपटूंना सूट देण्यावरुन प्रश्न उपस्थित केला होता. त्याने व्हिडिओ शेअर करुन म्हटले होते की, आंदोलक पैलवान थेट अंतिम चाचणीत सहभागी होतील, हा निकष कोणी बनवला आहे. जर अशाप्रकारे चाचण्या घ्यायच्या असतील, तर या कुस्तीपटूंशिवाय ऑलिम्पिक पदक विजेते रवी दहिया, दीपक पुनिया, अंशू मलिक, सोनल मलिक हे देशातील पहिल्या क्रमांकाचे कुस्तीपटू आहेत, त्यांनाही संधी दिली पाहिजे. केवळ सहा पैलवानांना सूट देणे चुकीचे आहे.
यानंतर विनेश फोगटने योगेश्वरवर निशाणा साधत ब्रिजभूषण सिंह यांचे पाय चाटल्याचा आरोप केला. विनेशने सोशल मीडियावर एका लांबलचक पोस्ट लिहून त्यांला कुस्तीचा जयचंद म्हटले. त्यानंतर कुस्तीपटूंनी त्यांच्या एका व्हिडिओत योगेश्वर दत्तवर टीका केली होती. साक्षी मलिक म्हणाली होती की, आम्ही कोणत्याही चाचणीतून सूट मागत नाही आहोत. आम्ही कधीही कोणाचाही हक्क मागितला नाही. आम्ही स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली आहे, फक्त आम्हाला वेळ हवाय.