नवी दिल्ली, दि. 25- वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदकाला गवसणी घालणाऱ्या बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधूची पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. सोमवारी क्रीडा मंत्रालयाकडून सिंधूची पद्म भूषण पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. सिंधूने नुकतंच कोरिया ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या चषकावर आपलं नाव कोरलं. कोरिया ओपन सुपर सीरिज जिंकणारी सिंधू ही पहिली भारतीय बॅडमिंटन पटू ठरली आहे. विशेष म्हणजे पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस केली जाणारी ती दुसरी खेळाडू ठरली आहे. बॅडमिंटनमध्ये भारताचे नाव उज्वल करणाऱ्या सिंधूला भारत सरकारने पद्म श्री पुरस्काराने सन्मानित केलं आहे.
माझ्या नावाची पद्म भूषण पुरस्कारासाठी शिफारस केल्यामुळे मी खूप खुश आहे. यासाठी सरकार आणि क्रीडा मंत्रालयाचे खूप धन्यवाद, अशी प्रतिक्रिया बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधूने दिली आहे.
याआधी टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्र सिंग धोनी याच्या नावाची पद्म भूषण पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली. 20 सप्टेंबर रोजी बीसीसीआयकडून धोनीच्या नावाची शिफारस पद्म भूषण पुरस्कारासाठी करण्यात आली होती. टीम इंडियाने २००७ मध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धा जिंकली. तसंच २०११ मध्ये विश्वचषक जिंकला. या दोन्ही स्पर्धांमध्ये धोनीने संघाचे नेतृत्त्व धोनीनं केलं होतं. बीसीसीआयने धोनीच्या नावाची शिफारस पद्मभूषण पुरस्कारासाठी केली आहे.
यंदाच्या हंगामात सिंधूने शानदार कामगिरी करत अनेक महत्त्वाच्या स्पर्धा गाजवल्या आहेत. २२ वर्षांची सिंधू सध्या चांगल्या फॉर्मात असून तिने कोरियन ओपनसोबतच इंडिया ओपन सुपर सिरीज आणि सईद मोदी इंटरनॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशीप या स्पर्धांची विजेतेपदे पटकावली आहेत. जागतिक क्रमवारीत सिंधू सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये तिने रौप्यपदकाची कमाई केली होती. याआधी कोणत्याही भारतीय बॅडमिंटनपटूला ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावता आलेलं नाही.
सिंधूची कामगिरी
बॅडमिंटनमध्ये ऑलिम्पिक आणि वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियशिप या प्रतिष्ठेच्या स्पर्धा समजल्या जातात. वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये पदकविजेती कामगिरी करणारी सिंधू पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू आहे. सलग दोनवर्ष सिंधूने या स्पर्धेत ब्राँझपदक विजेती कामगिरी केली.
मागच्या वर्षी सिंधूने ऑलिम्पिकची अंतिम फेरी गाठली होती. सर्व देशवासियांच्या नजरा टीव्हीवर खिळल्या होत्या. या क्रिकेटवेडया देशात बॅडमिंटनमध्ये भारताला पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळावे अशी सर्वांची मनापासून इच्छा होती. पण सिंधूला अंतिमफेरीचा चक्रव्युह भेदता आला नाही. स्पेनच्या कॅरोलिना मारीनने सिंधूला 21-19, 12-21, 15-21 असे पराभूत केले. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर बॅडमिंटनच्या खेळात भारताचा जो दबदबा निर्माण झाला आहे त्यात सायना नेहवाल आणि सिंधू या दोघींचा सिंहाचा वाटा आहे. भारताचे प्रसिद्ध बॅडमिंटनपटू गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारी सिंधू सध्या जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर आहे.