रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 11:21 PM2024-09-19T23:21:07+5:302024-09-19T23:22:31+5:30
खरे तर, भारत यूक्रेनला दारू-गोळा पाठवत असल्याचा दावा रॉयटर्सच्या एका वृत्तात करण्यात आला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी रॉयटर्सचा हा आरोप फेटाळून लावला आहे.
रशिया-युक्रेन युद्ध सुरू असताना आता भारतावर एक मोठा आणि खोटा आरोप करण्यात आला आहे. या आरोपावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाची पहली प्रतिक्रिया समोर आली आहे. खरे तर, भारत यूक्रेनला दारू-गोळा पाठवत असल्याचा दावा रॉयटर्सच्या एका वृत्तात करण्यात आला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी रॉयटर्सचा हा आरोप फेटाळून लावला आहे.
सर्व आरोप पूर्णपणे निराधार -
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, हे सर्व आरोप पूर्णपणे निराधार आहेत. कारण भारताने कुठलाही नियम तोडलेला नाही. आम्ही रॉयटर्सचे वृत्त बघितले आहे. हे पूर्णपणे अंदाजांवर आधारलेले असून यात कसल्याही प्रकारचे तथ्य नाही.
चुकीचे आणि खोडसाळपणाचे आरोप -
भारताने रॉयटर्सचे वृत्त खोडसाळपणाचे आणि पुर्णपणे खोटे असल्याचे म्हटले आहे. परराष्ट्रमंत्रालयाने म्हटले आहे की, "भारत आपल्या आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्यांचे पूर्ण निष्पक्षपणे पालन करतो. निर्यातीसाठीही भारताचे एक मजबूत कायदेशीर आणि नियामक फ्रेमवर्क आहे. संरक्षण सामग्रीच्या निर्यातीत भारताचे रेकॉर्ड निष्कलंक आहे. अंतिम वापरकर्त्याच्या जबाबदाऱ्या आणि प्रमाणपत्रांचे देखील सर्व निकषांप्रमाणे मूल्यांकन केले जाते. रॉयटर्सच्या वृत्तात भारताची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आली आहे."
सर्व कामे कायदेशीर आहेत -
परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, 'संरक्षणासंदर्भातील निर्यातीसाठी सर्व आंतरराष्ट्रीय कायदे आणि नियमांचे पूर्णपणे पालन होईल, हे सुनिश्चित केले जाते. या अंतर्गत कसल्याही प्रकारची चूक होण्यास वाव नाही. भारतातील सर्व उपक्रम पूर्णपणे कायद्याच्या कक्षेत आहेत आणि कधीही कोणतीही अनियमितता आढळून आलेली नाही."
Our response to media queries on Reuters report on diversion of Indian Defence Exports to Ukraine:https://t.co/uvfgB8gF3fpic.twitter.com/3qIVU0W9YW
— Randhir Jaiswal (@MEAIndia) September 19, 2024
रॉयटर्सच्या वृत्तात नेमके काय? -
उत्पादकांकडून विकली गेलेली भारतीय शस्त्रास्त्रे युरोपमार्गे युक्रेनमध्ये पोहोचली आहेत, यात तोफगोळ्यांचाही समावेश आहे, असा दावा रॉयटर्सच्या वृत्तात करण्यात आला आहे. एवढेच नाही तर, रशियाने या प्रकरणात हस्तक्षेप केला. मात्र, भारताने ही खरेदी-विक्री रोखण्यासाठी कसलेही पाऊल उचलले नाही. तसेच शस्त्रांस्त्रांची निर्यात एक वर्षापासून सुरू असल्याचा दावाही या वृत्तात करण्यात आला आहे.