ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 28 - उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनी 325 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. उत्तरप्रदेश विधानसभेत एकूण 403 जागा आहेत. आगमी विधानसभेची निवडणूक कोणाबरोबरही आघाडी करुन लढवणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुलायम सिंह यादव यांचा हा निर्णय अखिलेश यांच्यासाठी एक इशाराच आहे. बुधवारी बोलवलेल्या पत्रकारपरिषदेत 325 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. 176 विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट देण्यात आले आहे. उर्वरित 78 उमेदवारांची नावे लवकरच जाहीर होतील असे त्यांनी सांगितले.
मागच्या काही महिन्यात काका शिवपाल यादव आणि अखिलेश यादव यांच्यातील संघर्षाने टोक गाठले आहे. निवडणुकीला सामोरे जाताना अंतर्गत यादवीवर मात करण्याचे मुलायम यांच्यासमोर आव्हान आहे. उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर आता अखिलेश यादव काय भूमिका घेतात यावरही पक्षीय आणि आगामी निवडणुकीची समीकरणे बदलू शकतात.