लखनौ : राजकारणाची नाडी पकडण्याची अतुलनीय क्षमता असलेले अत्यंत लढाऊ नेते, समाजवादी पार्टीचे (सपा) संस्थापक आणि माजी संरक्षण मंत्री मुलायमसिंह यादव यांचे सोमवारी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. गुरगाव येथील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सपाच्या अधिकृत हॅण्डलवरून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये सपाचे अध्यक्ष व मुलायमसिंह यादव यांचे पुत्र अखिलेश यादव यांच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली. ‘माझे आदरणीय वडील आणि सर्वांचे नेताजी निवर्तले’, असे ट्विट अखिलेश यांनी केले.
शासकीय इतमामात अंत्यसंस्कारउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अखिलेश यांना फोन करून त्यांचे सांत्वन केले. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, यादव यांच्या पार्थिवावर संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. यादव यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी ३ वाजता त्यांच्या सैफई या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
आमदार, खासदार, मुख्यमंत्री ते संरक्षण मंत्रीसमाजवादाचे प्रणेते राम मनोहर लोहिया यांच्या विचाराने प्रभावित होऊन त्यांनी राजकीय प्रवास सुरू केला. ते १० वेळा आमदार आणि सातवेळा खासदार झाले. ते १९८९, १९९१, १९९३ आणि २००३मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. १९९६ ते ९८ दरम्यान त्यांनी देशाचे संरक्षण मंत्रिपद भूषविले. एकेकाळी ते देशाच्या पंतप्रधानपदाचेही दावेदार मानले जात होते.
राजकारणात अनेक चढ-उतारमुलायमसिंहांनी राजकीय प्रवासात अनेक चढ-उतार पाहिले. १९९२मध्ये त्यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. बसपासोबत आघाडी करून निवडणूक लढवली. २०१९मध्ये यादव यांनी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुकही केले आणि त्याचवर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा विजयी होण्याचे आशीर्वादही दिले हाेते.