नवी दिल्ली : रशियाने विकसित केलेल्या स्पुटनिक व्ही या लसीच्या ३० कोटी डोसचे भारतामध्ये पुढच्या वर्षी उत्पादन होणार आहे. विविध भारतीय कंपन्यांशी रशियाने स्पुटनिक व्ही लसीच्या डोसच्या उत्पादनाबाबत करार केले असून, त्यामुळे या उत्पादनाचे प्रमाण पूर्वीपेक्षा तिप्पट झाले आहे. रशियाने विकसित केलेल्या व भारतात उत्पादन केलेल्या स्पुटनिक व्ही लसीची चाचणी दिल्लीतील रशियन दूतावासामध्ये सुरू आहे. ही माहिती रशियाच्या अधिकाऱ्यांनीच ट्विटरवर दिली. भारत हा जगातील सर्वात मोठा लस उत्पादक देश आहे. लस उत्पादनाची क्षमता वाढविण्यासाठी भारतीय औषध कंपन्यांनी मोठी तयारी केली आहे. जगभरात कोरोना लसींना आगामी काळात प्रचंड मागणी येणार असून, त्यांच्या उत्पादनाचे जास्तीतजास्त काम भारतीय कंपन्यांना मिळावे, असा केंद्र सरकारचाही प्रयत्न आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड या संस्थेच्या सूत्रांनी सांगितले की, हिटेरो बायोफार्मा ही कंपनी स्पुटनिक व्ही या लसीचे १० कोटी डोस बनविणार असून, त्याबाबतचा करार या आधीच झाला आहे.लस ९१ टक्के परिणामकारक? स्पुटनिक व्ही लस ९१ टक्के परिणामकारक आहे, असा दावा रशियाने केला आहे. या लसीच्या भारतातील मानवी चाचण्या डॉ.रेड्डीज लॅबोरेटरीज या कंपनीतर्फे पार पाडल्या जात आहेत. या लसीचे वितरणही हीच कंपनी करणार आहे.सर्व कोरोना रुग्णालयातील अग्निप्रतिबंधक साधनांची तपासणी करा -सुप्रीम कोर्टदेशातील कोरोना रुग्णालयांमध्ये गेल्या काही महिन्यात आगी लागून रुग्ण व कर्मचारी मरण पावल्याच्या घटना घडल्या होत्या. भविष्यात असे प्रसंग येऊ नयेत, म्हणून देशातील सर्व कोरोना रुग्णालयांमध्ये पुरेशी अग्निप्रतिबंधक साधने आहेत की नाही याची तपासणी करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना दिला आहे.सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, देशातील सर्व कोरोना रुग्णालयांनी अग्निशमन विभागाकडून चार आठवड्यांच्या आत ना हरकत प्रमाणपत्र मिळवावे. हा आदेश न पाळणाऱ्या कोरोना रुग्णालयांवर कडक कारवाई केली जाईल.सर्वोच्च न्यायालयाचे न्या.अशोक भूषण यांच्या नेतृत्वाखालील व न्या. आर. एस. रेड्डी व न्या. एम. आर. शहा यांचा समावेश असलेल्या खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी झाली. गंभीर दखल... गुजरातच्या राजकोट येथील कोरोना रुग्णालयाला २७ नोव्हेंबर रोजी पहाटे लागलेल्या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू, तर एक रुग्ण गंभीररीत्या भाजला होता. त्या आधी ऑगस्ट महिन्यात अहमदाबादमध्ये कोरोना रुग्णालयाला आग लागून आठ जण मरण पावले होते.
Corona Vaccine: स्पुटनिक व्ही लसीच्या ३० कोटी डोसचे भारतात होणार उत्पादन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2020 3:25 AM