नुकतीच भारतात वापरासाठी मान्यता मिळालेल्या रशियाच्या कोरोना प्रतिबंधात्मक Sputnik V या लसीसाठी आता दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागणार नाही. भारतात या लसीचं उत्पादन डॉ. रेड्डीजकडून करण्यात येत आहे. "ही लस मे-जूनमध्ये भारतात उपलब्ध होईल," अशी माहिती डॉ. रेड्डीजकडून देण्यात आली. तसंच यावेळी त्यांनी या लसीच्या किंमतीचा खुलासाही केला. "मे-जून महिन्यापर्यंत आयातीच्या माध्यमातून भारतासाठी Sputnik V ही लस उपलब्ध असेल," अशी माहिती डॉ. रेड्डीज लॅबचे व्यवस्थापकीय संचालक जी.व्ही.प्रसाद यांनी दिली. एनडीटीव्हीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन नंतर Sputnik V ही तिसरी लस आहे. ज्याला भारतात वापरास मंजुरी मिळाली आहे. देशात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार आहे. त्यामुळे लसींच्या मागणीतही मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, यावेळी प्रसाद यांना मे-जून महिन्यांपर्यंत लसीचे किती डोस उपलब्ध होतील याबाबत प्रश्न विचारण्यात आला. "मे जून महिन्यापर्यंत लाखो डोस मिळतील," असं उत्तर त्यांनी यावेळी दिलं. तसंच लसीच्या किंमतीबाबत बोलताना त्यांनी याची कमाल किंमत १० डॉलर्स (जवळपास ७५० रूपये) इतकी असेल असंही सांगितलं. तसंच ही लस केवळ खासगी बाजारात उपलब्ध असणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. भारतात उत्पादन सुरू झाल्यावर किंमत कमी होण्याची शक्यता"आम्ही आयात करत असलेली लस ही केवळ खासगी बाजारात उपलब्ध असेल. ज्या किंमतीत अन्य देशांना ही लस पुरवली जात आहे त्याच किंमतीत ही लस भारतातही उपलब्ध व्हावी असं आमच्या भागीदारांचं म्हणणं आहे. जागतिक बाजारपेठेत या लसीची किंमत १० डॉलर्स इतकी आहे. भारतात ही कमाल किंमत असेल अशी आशा आहे. आम्ही ज्यावेळी या लसीचं उत्पादन सुरू करू तेव्हा याचा काही भाग आम्हाला निर्यात करावा लागेल आणि त्यावेळी सार्वजनिक बाजारात (सरकार) ही लस देण्यात येील. याची किंमत येणाऱ्या काही दिवसांमध्ये निश्चित केली जाईल. तसंच ही १० डॉलर्सपेक्षा नक्कीच काही प्रमाणात कमी असेल," असं प्रसाद म्हणाले. सुरुवातीला आयात केल्यानंतर डॉ. रेड्डीज लॅब Sputnik V लसीचं वेगानं उत्पादन घेईल. भारतात जेव्हा याचं उत्पादन सुरू होईल तेव्हा याची किंमत काही प्रमाणात कमी होऊ शकेल. आयात केलेल्या लसी येईपर्यंत भारतात तयार होणाऱ्या लसीही उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
Sputnik V Vaccine Price: पुढील एक-दोन महिन्यांत भारतात मिळणार Sputnik V लस; पाहा किती असेल किंमत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 9:04 PM
पहिली खेप आयात झाल्यानंतर भारतातही होणार लस उत्पादनाला सुरूवात
ठळक मुद्देडॉ. रेड्डीज लॅबचे व्यवस्थापकीय संचालक जी.व्ही. प्रसाद यांनी दिली महत्त्वाची माहितीभारतात उत्पादन सुरू झाल्यावर किंमत कमी होण्याची शक्यता