लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली: केंद्र सरकारने ‘भारत जोडो यात्रा’ बदनाम करण्यासाठी व रोखण्यासाठी आधी निवडणूक आयोग व राष्ट्रीय बाल हक्क आयोग (एनसीपीसीआर) यासारख्या घटनात्मक संस्थांचा वापर केला व आता ते गुप्तचर अधिकाऱ्यांचा वापर करत आहेत, असा आरोप काँग्रेसने सोमवारी केला. याप्रकरणी पक्षाने हरयाणातील सोहना पोलिसांकडे तक्रारही दाखल केली आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पत्रकारांना सांगितले की, ‘भारत जोडो’ यात्रेला बदनाम करण्यासाठी सरकारने घटनात्मक आणि कायदेशीर संस्थांचा वापर केला. आम्हाला निवडणूक आयोग व एनसीपीसीआर यांच्याकडून नोटिसा मिळाल्या. आम्ही तपशीलवार उत्तर दिले. ‘जेव्हा पंतप्रधानांनी गुजरात विधानसभेच्या प्रचारासाठी एका लहान मुलीचा वापर केला. आम्ही ते निवडणूक आयोग व एनसीपीसीआर यांच्या निदर्शनास आणून दिले, तेव्हा कोणतीही कारवाई झाली नाही,’ असे ते म्हणाले.
काँग्रेस म्हणते...
रमेश म्हणाले, ‘काही दिवसांपूर्वी हरयाणा सरकारचे काही अधिकारी यात्रेतील लोकांच्या विश्रांतीसाठी असलेल्या कंटेनरमध्ये आढळले होते. काय करत आहात असे विचारले असता त्यांनी स्वच्छतागृहाचा वापर करत असल्याचे सांगितले. ते हरयाणा सरकारचे गुप्तचर अधिकारी असल्याचे आम्हाला समजले आहे. दुहेरी इंजिनचे सरकार आहे. त्यामुळे हे सर्व वरून विचारल्यावर झाले असावे.’
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"