कोलंबो/काठमांडू : भारताचे शेजारी श्रीलंका आणि नेपाळ यांनी गुरुवारी आपल्या पहिल्या उपग्रहांचे प्रक्षेपण केले आहे. श्रीलंकेच्या उपग्रहाचे नाव ‘रावण-१’ असे असून, नेपाळच्या उपग्रहाचे नाव ‘नेपालीसॅट-१’ असे आहे. अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने या उपग्रहांचे प्रक्षेपण केले आहे.श्रीलंका आणि नेपाळ यांच्याबरोबरच जपानचाही एक उपग्रह यावेळी नासाने अवकाशात सोडला. बर्डस-३ नावाचे हे प्रक्षेपण यशस्वी झाल्याचे नासाच्या वतीने सांगण्यात आले. अमेरिकेच्या व्हर्जिनिया प्रांताच्या पूर्व किनाऱ्यावरील प्रक्षेपण तळावरून तिन्ही उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले. या उपग्रहांमुळे श्रीलंका आणि नेपाळ या दोन्ही देशांनी जागतिक अंतराळ युगात प्रवेश केला आहे.नेपाळची अंतराळ संशोधन संस्था ‘नेपाळ अकॅडमी आॅफ सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी’ने (एनएएसटी) आपल्या देशाच्या प्रक्षेपणाची अधिकृत माहिती जारी केली. नेपाळचे दोन शास्त्रज्ञ आभास मस्की आणि हरिराम श्रेष्ठ यांनी हा उपग्रह विकसित केला आहे. हे दोघेही सध्या जपानच्या क्युशू इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी या संस्थेत शिकत आहेत. नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी उपग्रहाचा विकास व प्रक्षेपणात सहभागी असलेल्या सर्व शास्त्रज्ञ आणि संस्थांचे अभिनंदन केले आहे. आपला स्वत:चा उपग्रह असणे ही देशासाठी अभिमानाची बाब आहे, असे ते म्हणाले.>श्रीलंकेचा ‘रावण-१’श्रीलंकेचा रावण-१ हा उपग्रह १.०५ किलो वजनाचा असून, त्याचे आयुष्य सुमारे दीड वर्षाचे आहे. हा उपग्रह जपानच्या क्युशू इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी या संस्थेने डिझाईन केला असून, याच संस्थेत श्रीलंकेच्या दोन अभियंत्यांनी हा उपग्रह निर्माण केला आहे.
श्रीलंका, नेपाळ यांनी अंतराळात सोडले उपग्रह
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 4:07 AM