नवी दिल्ली - श्रीलंकेच्या कोलंबोमध्ये तब्बल आठ ठिकाणी रविवारी (21 एप्रिल) साखळी बॉम्बस्फोट झाल्याची घटना समोर आली. यातील तीन बॉम्बस्फोट हे चर्चमध्ये तर 3 बॉम्बस्फोट हे हॉटेलमध्ये झाल्याची माहिती मिळाली होती. मात्र त्यानंतर आणखी दोन बॉम्बस्फोट करण्यात आले. सातव्या बॉम्बस्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर आठव्या बॉम्बस्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला ईस्टर संडेला झालेल्या या बॉम्बस्फोटात आतापर्यंत 290 जणांचा मृत्यू झाला असून 500 हून अधिक जण जखमी झाले आहेत.
कोलंबोतील या साखळी बॉम्बस्फोटात तीन भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी याआधी दिली होती. तसेच, कोलंबो येथील भारतीय उच्चायुक्तांच्या संपर्कात आहोत. तेथील परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे, असे सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरुन सांगितले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी कोलंबोतील साखळी बॉम्बस्फोटानंतर जेडीएसचे सात कार्यकर्ते बेपत्ता असून त्यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला असल्याचं ट्वीट केलं आहे.
'कोलंबोतील स्फोटांनंतर जेडीएसचे 7 कार्यकर्ते बेपत्ता असल्याचे माझ्या कानावर आले आहे. यांपैकी दोन जणांचा मृत्यू झाल्याचे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी नुकतेच स्पष्ट केल्याने मला धक्काच बसला आहे. हे दोघेही माझ्या चांगल्या परिचयाचे होते. या दुःखद घटनेमुळे त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला असून आम्ही त्यांच्या सोबत आहोत' असे ट्वीट कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केले आहे.
कर्नाटकातील जेडीएसचे सात कार्यकर्ते हे प्रचार अभियानानंतर सुट्टीसाठी 20 एप्रिल रोजी श्रीलंकेला गेले होते. कोलंबोतील शँग्रिला हॉटेलमध्ये त्यांनी राहण्याची व्यवस्था केली होती. मात्र रविवारी (21 एप्रिल) कोलंबोमध्ये तब्बल आठ साखळी बॉम्बस्फोट झाले. त्यानंतर कर्नाटकतील 7 जण बेपत्ता झाले आहेत. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या माहितीनुसार, श्रीलंकेतील बॉम्बस्फोटात दोन कन्नड नागरिकांचा मृत्यू झाला असून के. जी. हनुमनथरयाप्पा आणि एम. रंगप्पा अशी या दोघांची नावे आहेत, हे दोघेही जेडीएसचे सदस्य आहेत.
भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी कोलंबोतील बॉम्बस्फोटांच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. 'कोलंबो येथील भारतीय उच्चायुक्तांच्या संपर्कात आहोत. तेथील परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे' असं ट्वीट सुषमा स्वराज यांनी केलं आहे. तसेच कोलंबोतील साखळी बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर श्रीलंकेतील भारतीय दूतावासाकडून हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे.
कोलंबोतील परिस्थितीवर आम्ही नजर ठेवून असल्याची माहिती देणारे ट्वीट भारतीय दूतावासाने देखील केले आहे. या ट्वीटमध्ये भारतीय नागरिकांसाठी हेल्पलाइन क्रमांक देण्यात आला आहे. कोलंबो आणि बट्टीकालोआमध्ये स्फोट झाल्याची माहिती आम्हाला मिळाली असून आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे ट्वीटमध्ये म्हटले आहे. मदत किंवा इतर माहितीसाठी भारतीय नागरिकांना संपर्क करता यावा साठी क्रमांकही देण्यात आले आहेत. +94777903082,+94112422788,+94112422789, +94112422789 हे संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत तर श्रीलंकेतील संपर्क क्रमांकाव्यतिरिक्त+94777902082 +94772234176 या क्रमांकावरही भारतीय संपर्क करू शकतात.