Sri Lanka Crisis: आर्थिक संकट आणि जनक्षोभाचा सामना करणार्या श्रीलंकेची परिस्थिती बिकट होत चालली आहे. प्रचंड महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत झालेली वाढ यामुळे लोक रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध करत आहेत. जनतेचा रोष इतका वाढला आहे की, त्यांनी शनिवारी राष्ट्रपती भवनावर ताबा मिळवला आणि पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानाला आग लावली. या अशा परिस्थितीत भारताने श्रीलंकेला पाठिंबा दिला आहे.
भारताने US $ 3.8 अब्ज ची मदत दिलीश्रीलंकेतील परिस्थितीवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले, श्रीलंका आणि तेथील लोक ज्या आव्हानांना तोंड देत आहेत, त्याबद्दल आम्हाला माहिती आहे. या कठीण काळावर मात करण्यासाठी आम्ही श्रीलंकेच्या पाठीशी उभे आहोत. श्रीलंकेतील भीषण आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी भारताने यावर्षी 3.8 अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्तची मदत दिली आहे. आम्ही श्रीलंकेच्या वाईट काळात त्यांच्यासोबत उभे आहोत, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत एक निवेदनही जारी केले आहे.
'आम्ही श्रीलंकेच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत'आर्थिक अडचणीत सापडलेल्या श्रीलंकेला भारताने आश्वासन दिले आहे. आम्ही यापूर्वीही पाठिंबा दिला होता आणि आजही आम्ही श्रीलंकेच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असे भारताने म्हटले आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, आम्ही सर्व शक्य मार्गांनी मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि नेहमीच मदत केली आहे. ते त्यांच्या समस्येवर काम करत आहेत, आता पुढे काय होईल ते पाहू, अशी प्रतिक्रिया जयशंकर यांनी दिली.
भारताने इंधनाबाबत मदत केलीयाआधी भारताने श्रीलंकेला डिझेल-पेट्रोल (इंधन)संकटावर मात करण्यासाठी मोठी मदत केली आहे. श्रीलंकेत तेलाच्या तुटवड्यामुळे तेलाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. तेल फक्त अत्यावश्यक कारणांसाठी वापरण्याची परवानगी होती. तेल विक्रीवर बंदी घालण्यात आल्याने श्रीलंकेतील सर्वसामान्य जनतेला पेट्रोलियम पदार्थांच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत भारताने श्रीलंकेला अनेकवेळा मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणि डिझेल पाठवून मदत केली आहे.