नवी दिल्ली: श्रीलंकेत उद्भभवलेल्या आर्थिक आणि राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी या बैठकीला संबोधित केले. सर्वपक्षीय बैठकीला संबोधित करताना परराष्ट्र मंत्री म्हणाले की, श्रीलंकेला अत्यंत गंभीर संकटाचा सामना करावा लागत आहे आणि स्वाभाविकपणे भारताला त्यांची खूप काळजी आहे. भारतात अशाप्रकारची परिस्थिती निर्माण होण्याच्या दाव्यांना त्यांनी यावेळी स्पष्टपणे फेटाळून लावले.
भारताची श्रीलंकेशी तुलना चुकीची आहेश्रीलंकेच्या संकटावर सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी उद्घाटनपर भाष्य केले. ते म्हणाले की, हे एक अतिशय गंभीर संकट आहे. ही परिस्थिती आपल्या शेजारील देशात उद्भवल्यामुळे आपल्याला चिंता करण्याची आवश्यकता आहे. श्रीलंकेबद्दल अनेक खोट्या तुलना केल्या जात आहेत. काही लोक अशी परिस्थिती भारतात होऊ शकते का? असा प्रश्न विचारत आहेत. पण, श्रीलंकेशी भारताची तुलना करणे चुकीचे आहे. भारतात अशाप्रकारची परिस्थिती उद्भवणार नाही, असे ते म्हणाले.
सर्वपक्षीय बैठकीला अनेक नेते उपस्थित होतेसरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते. काँग्रेसचे पी चिदंबरम, मणिकम टागोर, राष्ट्रवादीचे शरद पवार, द्रमुकचे टीआर बालू आणि एमएम अब्दुल्ला, एआयएडीएमकेचे एम थंबीदुराई, तृणमूल काँग्रेसचे सौगता रॉय, नॅशनल कॉन्फरन्सचे फारूक अब्दुल्ला, आम आदमी पक्षाचे संजय सिंग, तेलंगणाचे केशव राव, वायएसआर काँग्रेसचे विजयसाई रेड्डी आणि एमडीएमकेचे वायको आदी सहभागी झाले होते.