रामेश्वरम- आपल्या सीमाक्षेत्रामध्ये येऊन मासेमारी केली असा ठपका ठेवत श्रीलंकेच्या नौदलाने चार तामिळी मच्छिमारांना अटक केली आहे. तामिळी मच्छिमारांना श्रीलंकेच्या नौदलाने ताब्यात घेण्याची ही या महिन्यातील तिसरी घटना आहे. तामिळनाडूच्या पदुकोट्टाई जिल्ह्यातील जगदिपट्टणम येथील मासेमारी करणाऱ्या लोकांनी श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळील नेदुंथीवू येथे मासेमारी केल्याने त्यांना श्रीलंकेच्या नौदलाने पकडल्याचे पदुकोट्टाईच्या सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. या महिन्यात एकूण 25 मच्छिमारांना श्रीलंकेच्या नौदलाने ताब्यात घेतले आहे. 5 नोव्हेंबर रोजी नागपट्टणमच्या 8 मच्छिमारांना तर 2 नोव्हेंबर रोजी पदुकोट्टाईच्या 13 मच्छिमारांना अटक झालेली आहे. या सर्वांवर श्रीलंकेच्या अधिकारक्षेत्रात येऊन मासेमारी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.नागपट्टणमच्या मच्छिमारांच्या तीन यांत्रिक बोटीही पकडण्यात आल्या आहेत. श्रीलंकेच्या ताब्यात असणाऱ्या 54मच्छिमारांना सोडवून आणावे तसेच 140 यांत्रिक बोटी सोडवून आणाव्यात अशी मागणी तामिळनाडू सरकारकडून केंद्र सरकारकडे वारंवार केली जात आहे. मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या मच्छिमारांना सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती केली होती. तसेच हे मच्छिमार आपल्या पारंपारिक मत्स्यक्षेत्रातच मासेमारी करतात असेही त्यांनी या पत्रात लिहिले होते.
पंतप्रधानांच्या भेटीने मच्छिमारांचा प्रश्न सुटणार का ?पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. तत्पूर्वी, द्रमुकचे कार्यकारी अध्यक्ष आणि करुणानिधींचे चिरंजीव एम. के. स्टॅलिन यांनी पंतप्रधान मोदी यांचे निवासस्थानी स्वागत केले. त्यांच्या या भेटीमुळे अण्णा द्रमुकचे नेते अस्वस्थ झाले आहेत, तर तामिळनाडूमध्येही आश्चर्य व्यक्त होत आहे. इतकेच नव्हे, तर भाजपामध्येही काहीशी खळबळ माजली आहे. पंतप्रधानांच्या या भेटीमुळे तामिळनाडूच्या विविध प्रश्नांबरोबर मच्छिमारांना भारतात पुन्हा अणले जाईल का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मच्छिमारांबरोबर तामिळनाडूच्या दुष्काळाचाही मोठा प्रश्न आहे.कालच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि करुणानिधी यांच्या भेटीवेळी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, राज्यमंत्री पी. राधाकृष्णन आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तामिलीसाई सुंदरराजन यांची उपस्थिती होती. व्हीलचेअरवर असलेल्या करुणानिधी यांच्याजवळ बसून मोदी यांनी त्यांची चौकशी केली. करुणानिधींची मुलगी कणिमोळी यांच्यासह द्रमुकचे अन्य नेतेही या वेळी हजर होते. अण्णा द्रमुकशी मैत्री असताना, मोदी यांनी द्रमुक नेत्यास भेटण्याचे कारण काय, अशी चर्चा इथे सुरू आहे.