नवी दिल्ली: श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची तुलना कुत्र्याशी केली आहे. श्रीराम सेना आणि लंकेश यांच्या हत्येचा कोणताही संबंध नाही, याचा पुनरुच्चारदेखील त्यांनी केला आहे. 'गौरी लंकेश यांच्या हत्येवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाष्य करावं, असं अनेकांना वाटतं. मात्र कर्नाटकात काही कुत्रे मरत असतील, तर त्यावर मोदींनी भाष्य का करावं?,' असं वादग्रस्त विधान मुतालिक यांनी केलं. श्रीराम सेनेचा गौरी लंकेश यांच्या हत्येशी कोणताही संबंध नाही, असं मुतालिक यांनी म्हटलं. 'हिंदुत्ववादी संघटनेनं गौरी लंकेश यांच्या हत्येचा कट रचला होता, असं अनेकजण म्हणत आहेत. काँग्रेसच्या शासन काळात कर्नाटक आणि महाराष्ट्रात प्रत्येकी 2 हत्या झाल्या. मात्र काँग्रेस सरकार शांतता आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरलं, तेव्हा कोणीच काही बोललं नाही. मात्र आता प्रत्येकजण लंकेश यांच्या मृत्यूवर मोदी गप्प का?, असा प्रश्न विचारत आहे. पंतप्रधानांनी याबद्दल का बोलावं? कर्नाटकमध्ये एखाद्या कुत्र्याचा मृत्यू झाला, त्यावर मोदींनी प्रतिक्रिया द्यावी, अशी अपेक्षा तुम्ही का करता?,' असं वादग्रस्त विधान मुथालिक यांनी केलं.प्रमोद मुतालिक यांच्या विधानावर काँग्रेसच्या बृजेश कालप्पा यांनी आक्षेप घेतला. 'मुतालिक कोणत्या प्रकारच्या हिंदू धर्माबद्दल बोलत आहेत? आम्ही नक्कीच याबद्दल त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई व्हावी, यासाठी पावलं उचलू,' असं ते म्हणाले. मुतालिक यांच्या विधानावर टीकेची झोड उठल्यावर त्यांनी सारवासारव सुरू केली. 'कर्नाटकमध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर मोदी भाष्य करु शकत नाहीत. मी गौरी लंकेश यांची तुलना थेट कुत्र्याशी तुलना केली नव्हती,' असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.
श्रीराम सेनेच्या प्रमुखांकडून गौरी लंकेश यांची कुत्र्याशी तुलना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2018 8:49 AM