Sri Ram Janmabhoomi Temple: आज भारतासाठी मोठा दिवस आहे. नव्याने बांधलेल्या संसद भवनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. यासोबतच सभागृहात संगोल(राजदंड) स्थापित करण्यात आला आहे. या भव्यदिव्य सोहळ्यात संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सर्व 775 खासदार, सर्व राज्यांचे राज्यपाल व मुख्यमंत्री, सर्व मंत्रालयांचे सचिव, लोकसभेचे माजी अध्यक्ष व राज्यसभेचे सभापती आणि उपसभापती उपस्थित होते.
दरम्यान, संसदेच्या नव्याने बांधलेल्या इमारतीचे उद्घाटन झाल्यानंतर आता अयोध्येतील श्री राम मंदिराची बारी आहे. पुढील वर्षी श्री राम मंदिराचे उद्घाटन होणार असून, यासाठी गेल्या काही महिन्यांपासून वेगाने काम सुरू केले आहे. अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम पाहूनच या कामाचा वेग लक्षात येईल. राम मंदिर ट्रस्टने ट्विटरवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात मंदिराचा तळमजला तयार झाल्याचे दिसत आहे.
अयोध्येत भव्य राम मंदिराचे ताजे फोटो समोर आले आहेत. यात राम मंदिराचा तळमजला जवळपास तयार झाल्याचे दिसत आहे.
राम मंदिराचे बांधकाम सुरू असलेल्या रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्यासह मंदिर ट्रस्टच्या अधिकृत ट्विटरवरुन हे फोटो शेअर केले आहेत. राम मंदिर 2024 पर्यंत भाविकांसाठी खुले करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यामुळे संसद भवनानंतर आता राम मंदिराचे उद्घाटनही भव्य-दिव्य असणार आहे.