नवी दिल्ली: रामदेव बाबांच्या पतंजलीला आता आर्ट ऑफ लिव्हिंगच्या श्री श्री रवीशंकर यांच्याकडून कडवी टक्कर मिळणार आहे. रवीशंकर यांची एफएमसीजी क्षेत्रातील कंपनी जाहिरातींवर जवळपास 200 कोटी रुपये खर्च करणार आहे. आयुर्वेद आणि हर्बल क्षेत्रात मुसंडी मारण्यासाठी श्री श्री यांच्या ब्रँडची देशभरात 1 हजार दुकानं उघडण्यात येणार आहेत. या उत्पादनांच्या जाहिरातींसाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात येणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल स्पर्धेवेळी श्री श्री यांच्या कंपनीनं जाहिरातींवर 10 कोटी रुपये खर्च केले होते. श्री श्री तत्त्व नावानं दुकानं सुरू करणाऱ्या श्री श्री आयुर्वेद ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी तेज कटपिटिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता कंपनी वेगाने विस्तार करण्यावर भर देणार आहे. यासाठी अतिशय आक्रमक जाहिरातबाजी केली जाणार आहे. याशिवाय गेल्या काही वर्षांपेक्षा वेगळ्या पद्धतीनं जाहिराती करण्यास प्राधान्य दिलं जाणार आहे. 'यंदाच्या आर्थिक वर्षात 3-4 मोठी जाहिरात अभियान चालवली जाणार आहेत. या जाहिराती वृत्तवाहिन्यांसह मनोरंजन आणि प्रादेशिक वाहिन्यांवरदेखील दाखवल्या जातील. याशिवाय ऑन ग्राऊंड आणि आऊटडोर जाहिरातींनादेखील प्राधान्य देण्यात येणार आहे,' अशी माहिती कटपिटिया यांनी दिली. मात्र त्यांनी जाहिरातींसाठी नेमका किती खर्च केला जाणार, याबद्दलची माहिती दिलेली नाही. मात्र जाहिरात एजन्सींनी दिलेल्या माहितीनुसार श्री श्री तत्त्व जाहिरातींवर जवळपास 200 कोटी रुपये खर्च करणार आहे.
बाबा विरुद्ध बाबा; आता रामदेव बाबांना 'हे' बाबा देणार टक्कर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2018 2:27 PM