इंदूर: हिंदी चित्रपटसृष्टीतील श्रीदेवी, माधुरी, नर्गिस या अभिनेत्रींकडे प्रेक्षक ज्या नजरेने पाहतात, त्याच नजरेने सनी लिओनीकडे का पाहिले जात नाही, असा सवाल पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी उपस्थित केला. ते इंदूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी हार्दिक यांनी म्हटले की, सनी लिओनीकडे केवळ एक अभिनेत्री म्हणून का पाहिले जात नाही? प्रत्येकवेळी तिची पॉर्नस्टारची ओळख आड का येते? आपण नर्गिस, माधुरी आणि श्रीदेवी या नट्यांकडे ज्या नजरेने पाहतो तसेच सनी लिओनीकडे का पाहू नये?, असे अनेक सवाल हार्दिक यांनी उपस्थित केले. आपण हाच दृष्टीकोन ठेवून चालू तोपर्यंत देशात काहीच बदलणार नाही, असे हार्दिक पटेल यांनी म्हटले.यावेळी हार्दिक पटेल यांनी भाजपावरही टीका केली. भाजपा म्हणजे ‘सत्ता लालची पार्टी’ आहे. जर २०१९ मध्ये निवडणुकांत नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर त्यानंतर देशात पुन्हा निवडणुका होणार नाहीत. ज्या पद्धतीने कर्नाटक निवडणुकांनंतर राज्यपालांनी बहुमत असतानाही काँग्रेस आणि जेडीएसला सत्तास्थापनेची संधी न देता भाजपाला बोलावलं, त्यावरुन देशात घटना संपवण्याची तयारी सुरू असल्याचा आरोप हार्दिक पटेल यांनी केला.
श्रीदेवी, माधुरीकडे पाहाता; त्याच नजरेनं सनी लिओनीकडे का पाहात नाही?- हार्दिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 12:26 PM