Srinagar Terrorist Attack: जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी चेक पोस्टवर ड्युटीवर असलेल्या पोलिसांवर गोळीबार केला. या हल्ल्यात जम्मू-काश्मीर पोलिस विभागातील एएसआय शहीद झाले. लाल बाजार परिसरात दहशतवाद्यांनी रस्त्यावर सुरक्षा कर्तव्य बजावत असलेल्या एका अधिकाऱ्यासह तीन पोलिसांवर गोळीबार केला. या हल्ल्यात 2 जवान जखमी झाले आहेत. ASI मुश्ताक अहमद (ASI Mushtaq Ahmed) असे मृत अधिकाऱ्याचे नाव असून ते कुलगामचे रहिवासी होते. त्यांच्या शहीद झाल्याची बातमी घरी पोहोचताच कुटुंबासह संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे.
एएसआय मुश्ताक अहमद हे रविवारी कुटुंबासोबत ईद साजरी केल्यानंतर सोमवारी दुपारी श्रीनगरमधील लाल बाजार पोलीस ठाण्यात कर्तव्यावर रुजू झाले. ते आपल्या ड्युटीवर असताना दहशतवाद्यांनी चेकपोस्टवर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले. हल्ल्याच्या काही तासांनंतर दहशतवादी संघटना ISISच्या मीडिया फोर्स AMAQने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. विशेष म्हणजे, मुश्ताक अहमद यांचा दहशतवादी मुलगा दोन वर्षांपूर्वी चकमकीत ठार झाला होता.
हल्ला कॅमेऱ्यात रेकॉर्डदहशतवाद्यांनी हा हल्ला कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला असून त्यांच्याकडून एके-47 च्या छायाचित्रासह एक व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. हल्ल्यादरम्यान पोलिसांकडून एके-47 हिसकावून घेतल्याचा दावा इसिसने केला आहे. ISIS ने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये या गटाच्या 2-3 दहशतवाद्यांनी पिस्तुल आणि AK-47 रायफल घेऊन हल्ला केल्याचे दिसत आहे.
2 वर्षांपूर्वी दहशतवादी मुलगा मारला गेलाविशेष म्हणजे, 2020 मध्ये मुश्ताक अहमद यांचा धाकटा मुलगा घरातून बेपत्ता झाला होता, नंतर तो दहशतवाद्यांमध्ये सामील झाल्याची माहिती समोर आली. आकिब मुश्ताक असे त्याचे होते आणि तो अवंतीपूर येथील इस्लामिक विद्यापीठातून बी-टेक करत होता. पण, शिक्षणाच्या काळातच त्याने हिंसाचाराचा मार्ग निवडला आणि सुरक्षा दलांच्या हाती त्याचा अंत झाला. कुलगामच्या गुद्दूर गावात हिजबुल मुजाहिद्दीनच्या तीन स्थानिक दहशतवाद्यांसह आकिबला गोळ्या घालून ठार करण्यात आले. दहशतवाद्यांचे मृतदेह कुटुंबीयांच्या हाती न देण्याचा निर्णय घेतल्यामुळे पोलिसांनी उरी येथील दहशतवादी कब्रस्तानमध्ये त्याचा दफनविधी केला. मुलाच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी आता पोलीस अधिकारी वडील दहशतवाद्यांच्या गोळ्याचे बळी ठरले आहेत.