नवी दिल्ली : एका व्यक्तीची हरवलेली 90 हजार रुपयांनी भरलेली बॅग जम्मू-काश्मीरच्या पोलिसाला सापडली. त्यानंतर त्या पोलिसाने प्रामाणिकपणे संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन पैशांची बॅग परत केली.
श्रीनगरमधील कमारवारी येथे जम्मू-काश्मीर पोलिसांची तपासणी सुरु होती. यावेळी उमर मुस्ताक या पोलिसाला 90 हजार रुपयांनी भरलेली बॅग सापडली. त्यानंतर उमर मुस्ताक यांनी आपल्या वरिष्ठ अधिका-यांना याबाबतची माहिती दिली आणि संबंधित व्यक्तीचा शोध घेत त्याला परत केली.
अब्दुल अझिझ माल्ला या व्यक्तीची ही बॅग होती. त्यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. दरम्यान, जम्मू-काश्मीर पोलिसांनी अब्दुल अझिझ माल्ला यांचीच पैशांची बॅग आहे की नाही, याची खातरजमा करुन त्यांना ती परत केली. अब्दुल अझिझ माल्ला हे गेल्या काही दिवसांपूर्वी श्रीनगर महानगरपालिकेतून निवृत्त झाले होते. त्यांच्याजवळ पेन्शनच्या पैशांची बॅग होती.
दरम्यान, सोशल मीडियात उमर मुस्ताक या पोलिसाच्या प्रामाणिकपणाची स्तुती करण्यात येत आहे. 'प्रामाणिकपणा जिंवत आहे', 'हॅट्स ऑफ टू उमर मुस्ताक', अशा प्रतिक्रिया सोशल मीडियात येत आहेत.