ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 13 - श्रीनगरमध्ये लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाकडे नागरीकांनी पाठ फिरवली असून, पहिल्या तीन तासात 10 वाजेपर्यंत फक्त 1 टक्का मतदानाची नोंद झाली आहे. जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर लोकसभा मतदारसंघात रविवारी पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले. पण यावेळी मोठया प्रमाणावर हिंसाचार झाल्याने निवडणूक आयोगाने सर्वाधिक फटका बसलेल्या 38 मतदान केंद्रावर गुरुवारी पुन्हा फेरमतदान घेण्याचे आदेश दिले.
34,169 पात्र मतदारांपैकी सकाळी 10 पर्यंत फक्त 344 नागरीकांनी मतदानाचा हक्क बजावला अशी माहिती अधिका-यांनी दिली. बडगाम, खानसाहिब या विधानसभा मतदारसंघात एकाही नागरीकाने मतदान केलेले नाही. चरर ई शरीफमध्ये फक्त दोघांनी मतदान केले.
रविवारी सर्वाधिक हिंसाचार झालेल्या चादूरामध्ये फक्त 200 नागरीकांनी तर, बीरवाह विधानसभा मतदारसंघात फक्त 142 जणांनी मतदान केले आहे. मतदान केंद्राजवळ हिंसाचार करणा-या जमावाला पांगवण्यासाठी जवानांनी केलेल्या गोळीबारात आठ जण ठार झाले होते. रविवारच्या हिंसाचाराची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.