जम्मू : जम्मू- काश्मीर आणि लडाखमध्ये तापमानाची घसरण सुरूच आहे. कारगिलच्या द्रास भागात तापमान उणे २६ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. जम्मूमध्ये किमान तापमान ८ अंश सेल्सिअस झाले आहे.
श्रीनगरमधील नागरिकांना रविवारी जाग आली तेव्हा परिसरावर धुक्याची चादर पसरली होती. रात्रीचे तापमान येथे उणे ४ अंश सेल्सिअस झाले होते. या हिवाळ्यातील हे सर्वात कमी तापमान आहे. येथील प्रसिद्ध सरोवराच्या काही भागातील पाण्याचा अक्षरश: बर्फ झाला आहे.कारगिलमधील द्रास हे जगातील असे ठिकाण आहे जिथे प्रचंड थंडीतही लोक राहतात. येथे किमान तापमान उणे २६ अंश सेल्सिअस आहे.
दक्षिण काश्मीरच्या पहलगाममध्ये तापमान ६.३ अंश सेल्सिअस झाले होते. गुलमर्गमध्ये तापमान उणे ५.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. वैष्णोदेवी मंदिराकडे जाणाºया भाविकांच्या आश्रयासाठी जिथे शिबीर असते त्या कटरामध्ये तापमान ८.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. हवामान विभागाने सांगितले की, जम्मू- काश्मिरात आणि लडाखच्या कारगिलमध्ये ११ ते १३ डिसेंबरपर्यंत बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.
श्रीनगरमधील विमान उड्डाणे रद्द
श्रीनगर विमानतळाहून होणारी उड्डाणे सलग दुसºया दिवशी रद्द करण्यात आली आहेत. काश्मीर खोºयातील दाट धुक्यामुळे दृश्यमानता खराब झाली आहे. त्यामुळे ही उड्डाणे रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. विमानतळावरील उड्डाणे तीन दिवसांपासून प्रभावित झाली आहेत. शुक्रवारी काही उड्डाणे रद्द करण्यात आली होती, तर शनिवारी उड्डाण झालेच नाही.