नवी दिल्ली : इलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर एका भारतीयाच्या सल्ल्यानेच कंपनीशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेत आहेत. श्रीराम कृष्णन असे या भारतीय वंशाच्या व्यक्तीचे नाव आहे. चेन्नईत जन्मलेले भारतीय-अमेरिकन अभियंता श्रीराम कृष्णन यांनी स्वतः इलॉन मस्कला मदत करत असल्याची माहिती ट्विट करून दिली आहे.
श्रीराम चेन्नईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मले. ‘मी काही महान लोकांसह इलॉन मस्क यांना ट्विटरसाठी तात्पुरती मदत करत आहे,’ असे त्यांनी सांगितले. मात्र, त्यांचे मुख्य काम अजूनही ए१६झेड (a16z) कंपनीशी संबंधित असल्याचे त्यांनी पुढच्याच ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे.
पुण्याच्या मित्राकडून मस्क यांची स्तुती
मस्क यांना मिळणारा द्वेष चुकीचा आहे. मस्क सर्वांसाठी मोठी प्रेरणा आहे, असे त्यांचा पुण्यातील मित्र सॉफ्टवेअर अभियंता प्रणय पाथोळे याने म्हटले आहे.
भारतातील ५४ हजारांहून जास्त अकाउंट ‘बॅन’
ट्विटरने २६ ऑगस्ट ते २५ सप्टेंबरदरम्यान बाललैंगिक शोषण, सहमती नसताना नग्नता आणि संबंधित सामग्रीला प्रोत्साहन दिल्याबद्दल भारतातील ५२,१४१ खात्यांवर बंदी घातली आहे. याशिवाय दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या १,९८२ खात्यांवरही बंदी घातली.