भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशाचे सरासरी वय केवळ 32 वर्षे होते. अर्थात तेव्हा भारतीय लोक सरासरी केवळ 32 वर्षांपर्यंतच जगू शकत होते. मात्र, आता हे सरासरी वय 69 वर्षांपेक्षा अधिक झाले आहे. म्हणजेच स्वातंत्र्यानंतर भारतीयांच्या सरासरी वयात दुप्पट पेक्षाही अधिक वाढ झाली आहे. सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टमच्या (SRS) नव्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. मात्र, असे असले तरी जागतिक सरासरीचा विचार करता हे अद्यापही कमीच आहे. जगातील सरासरी वय 72 वर्षे 6 महिने एवढे आहे.
SRS च्या Abridged Life Table 2015-19 चा अहवाल नुकताच जारी झाला आहे. यात, भारतीयांचे सरासरी वय 69.7 वर्षं एवढे झाले असल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर, पुरुषांच्या तुलनेत महिला अडीच वर्षे अधिक जगतात. देशातील पुरुषांचे सरासरी वय 68 वर्षे 4 महिने आहे, तर महिलांचे सरासरी वय 71 वर्षे 1 महिना एवढे आहे, असेही या अहवालातून समोर आले आहे.
याच बरोबर, शहरी लोकांचे वय ग्रामीण लोकांच्या तुलनेत अधिक आहे. शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांचे सरासरी वय 73 वर्षे आहे, तर खेड्यात राहणाऱ्यांचे वय 68 वर्षे 3 महिने आहे, असेही या अहवालात म्हणण्यात आले आहे.
दिल्लीतील लोकांचे सरासरी वय सर्वात जास्त, छत्तीसगडमधील लोकांचे सर्वात कमी - या अहवालानुसार दिल्लीतील लोकांचे सरासरी वय सर्वात जास्त आहे. येथील लोकांचे सरासरी वय 75 वर्षे 9 महिने आहे. तर सर्वात कमी सरासरी वय छत्तीसगडमधील लोकांचे आहे, येथील लोक 65 वर्षे आणि 3 महिने जगू शकतात. दिल्लीपाठोपाठ केरळचा क्रमांक लागतो, येथील लोकांचे सरासरी वय 75 वर्षे 2 महिने एवढे आहे. तर महाराष्ट्रातील लोकांचे सरासरी वय 72.7 वर्ष एवढे सांगण्यात आले आहे. यातही पुरुषांचे सरासरी वय 71.6 तर महिलांचे सरासरी वय 74.0 एवढे सांगण्यात आले आहे.
वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांनंतर आपण किती वर्षांपर्यंत जगू शकता - ?या अहवालात भारतामध्ये एक ठरावीक वय पार केल्यानंतर, आणखी किती वर्षांपर्यंत जगता येऊ शकते, याचाही अंदाज लावण्यात आला आहे. उदाहरणार्थ, जन्माच्या वेळी तुमचे सरासरी वय 69 वर्षे 7 महिने आहे. मात्र, जर वयाचे 1 वर्ष पूर्ण झाले तर आणखी 71.3 वर्षे जगू शकतात. वयाचे 5 वर्षे पूर्ण झाली तर आणखी 67.7 वर्षे अधिक जगू शकता.
याच प्रमाणे, वयाची 10 वर्षे पार केल्यानंतर आणखी 62.9 वर्षे जगू शकतात. 20 वर्षांच्या वयानंतर आणखी 53.3 वर्षांपर्यंत जगू शकता. वयचे 30 वर्ष ओलांडल्यानंतर, आणखी 43.9 वर्षे जगू शकता. 40 वर्ष ओलांडल्यानंतर आणि 34.7 वर्षे जगता येईल, वयाची 50 वर्ष ओलांडल्यानंतर आणि 26 वर्षे गता येईल, वयाची साठी ओलांडल्यानंतर, आणखी 18.3 वर्षे आणि 70 वर्षे पूर्ण केल्यानंतर आणखी नंतर 11.8 वर्षे जगता येऊ शकते.