नवी दिल्ली - महाराष्ट्रात बोर्डाच्या परीक्षा टळल्यानंतर आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही केंद्र सरकारकडे दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी केली होती. तसेच, ऑनलाइन परीक्षांसह पर्यायी मार्ग शोधण्याचे आवाहनही त्यांनी केले होते. त्यानुसार, केंद्र सरकारनेही दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.
देशभरात कोरोनाचा कहर वाढत असून महाराष्ट्रात दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकल्यात आल्या आहेत. त्यातच, सीबीएसई बोर्डाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर महाराष्ट्र सरकारकडूनही दहावीच्या परीक्षा रद्द करण्यासंदर्भात तज्ज्ञांशी विचारविनमय सुरू आहे. त्यातच, आता आयसीएसई बोर्डाच्या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ४ मे पासून घेण्यात येणाऱ्या आयसीएसई दहावी बारावी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून जूनच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाची परिस्थिती पाहून परीक्षांबाबत निर्णय घेतला जाईल, असे बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
आयसीएसई दहावी बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन ऑप्शन (पर्याय) देण्यात आले आहेत. त्यानुसार, दहावी बोर्ड परीक्षा देणारे विद्यार्थी ऑफलाइन लेखी परीक्षा देऊ शकतात किंवा लेखी परीक्षा न देता क्रायटेरिया नुसार त्यांचा निकाल जाहीर केला जाईल. त्यामुळे, विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार बोर्डाकडून परीक्षा आणि निकालाचा निर्णय होईल.