देवघर : झारखंडच्या देवघर जिल्ह्यातील भगवान शिवाच्या वैद्यनाथबाबा धाममध्ये श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांची प्रचंड गर्दी उसळल्याने चेंगराचेंगरी होऊन १० ठार, तर ३० जण जखमी झाले. मृतांमध्ये नऊ पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.राज्याचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख, तर जखमींना प्रत्येकी ५० हजारांच्या मदतीची घोषणा केली. तसेच घटनेच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे आदेश दिले. सोमवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. रांचीपासून ३५० कि. मी. दूर देवघरस्थित बाबा धाममध्ये दुसरा श्रावणी सोमवार असल्यामुळे भाविकांची गर्दी उसळली होती. लाखोंच्या संख्येत कावड यात्रेकरू या ठिकाणी आले होते. शिवलिंगाच्या जलाभिषेकासाठी रात्रीपासूनच रांगा लागल्या होत्या. याचदरम्यान पहाटे ४ च्या सुमारास देवघर मंदिरानजीक बेला बागानस्थित दुर्गा मंदिरात रांगेत पुढे जाण्याच्या चढाओढीतून चेंगराचेंगरी झाली. मंदिरापासून तीन कि.मी. अंतरावर चेंगराचेंगरीची ही घटना घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी चेंगराचेंगरीच्या घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केले. (वृत्तसंस्था)उत्तर भारतात श्रावण मास सुरू झाला आहे. या महिन्यात देवघर बाबा धाम येथे भाविकांची मोठी गर्दी उसळते. श्रावणी सोमवारी एकाच दिवशी दोन ते तीन लाख भाविक शिवलिंगाचे दर्शन घेतात.गृहमंत्री राजनाथसिंह यांनी लोकसभेत चेंगराचेंगरीची ही घटना दुर्दैवी असल्याचे सांगत मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केल्या. देवघर येथे भाविकांची मोठी गर्दी आहे. राज्य सरकारकडून अतिरिक्त दलांची मागणी करण्यात आली असल्याने या ठिकाणी त्वरित शीघ्र कृतिदल पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.
कावड यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी,१० ठार
By admin | Published: August 11, 2015 2:56 AM