पाटणा- बिहारच्या बेगूसरायमध्ये कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी गंगास्नानादरम्यान मोठी चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर दहा जण जखमी झाले आहेत. सिमरियामध्ये कार्तिक पौर्णिमेनिमित्ताने गंगास्नानासाठी मोठ्या संख्येने भाविक गर्दी करतात. याचदरम्यान काही अफवा पसरून मोठी चेंगराचेंगरी झाली. गंगाघाटावर होणारी लोकांची गर्दी पाहता प्रशासनाकडून आवश्यक सोयीसुविधा करण्यात आल्या नसल्याचा आरोप होतो आहे. ही दुर्घटना शनिवार सकाळी घडली. या चेंगराचेंगरीत किमान १० जण जखमी झाल्याचे सांगण्यात येतं. सर्वांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरू करण्यात आलं आहे. सिमारिया घाटावर अर्ध कुंभ सुरू आहे. कार्तिक पौर्णिमेसाठी तिथे भाविकांची मोठी गर्दी झाली असून त्याचवेळी ही दुर्घटना घडली
मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये दोन वृद्ध महिलांचा समावेश आहे. लोकांनी या चेंगराचेंगरीसाठी पोलीस प्रशासनाला जबाबदार धरलं आहे. पोलिसांची व्यवस्था कुचकामी ठरल्याने ही घटना घडल्याचं उपस्थितांचं म्हणणं आहे. प्रशासनाने गर्दीला नियंत्रणात ठेवण्यासाठी कुठलिही व्यवस्था केली नसल्याचं उपस्थितांनी सांगितलं आहे.
दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी मृतांच्या नातेवाईकांना चार लाख रूपयांची मदर जाहीर केली आहे.