येत्या दीड-दोन महिन्यांत लोकसभेचा बिगुल वाजू शकतो. अशातच शक्तीहीन होत चाललेल्या काँग्रेसने प्रादेशिक पक्षांचा बुस्टर मिळविण्यासाठी जागावाटपाच्या बोलण्यांना सुरुवात केली आहे. हे जागावाटप राज्या राज्यातील राजकीय परिस्थितीवर अवलंबुन आहे. महाराष्ट्रात ठाकरे गट शिवसेना आणि शरद पवार गट राष्ट्रवादी यांची ताकद विभागली गेल्याने काँग्रेसने ताठ भाषा ठेवली आहे. तर महाराष्ट्राच्या जवळपास दीडपटीहून अधिक जागा असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस नरमाईच्या भुमिकेत आली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये सपा हा सर्वात मोठा प्रादेशिक पक्ष आहे. राज्याचा आवाका पाहता तिथे काँग्रेसचे अस्तित्व तसे फार कमी आहे. त्यात भाजपाचे गेल्या दोन टर्मपासून सरकार आहे. उत्तर प्रदेशनेच भाजपाला लोकसभेतही सत्तेत नेऊन बसविले आहे. उत्तर प्रदेशमध्ये ८० जागा आहेत. यामुळे काँग्रेस ४० जागांवर दावा ठोकणार असे सांगितले जात होते. परंतु, काँग्रेसने सपासोबत बोलणी सुरु केली असून २५ जागांवरच मागणी केल्याचे समजते आहे.
काँग्रेसने जिंकता येतील अशा २५ जागा निवडल्या आहेत. यावर सपाची मते जोडली तर ती भाजपवर भारी पडण्याची शक्यता आहे. २००९ पासुनची आकडेवारी विचारात घेण्यात आली असून तेव्हाचाच फॉर्म्युला आताही वापरला जाणार आहे. आधी सपाला ३० जागांपेक्षा कमी जागा घेणार नाही असे काँग्रेसने संकेत दिले होते. परंतु आता २००९ चा २३ जागांचा फॉर्म्युला सपासमोर चर्चेला ठेवण्यात आला आहे. यात दोन जागांची वाढ करण्यात आली आहे.
या जागा कुठल्या आहेत हे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवरून स्पष्ट होत आहे. ही यात्रा युपीच्या २० जिल्ह्यांमधून जाणार आहे. या जिल्ह्यांमध्ये २४ लोकसभा मतदारसंघ आहेत. तसेच ११ दिवस यासाठी घेण्यात आले आहेत. आग्रा, अलिगढ, बरेली, लखनऊ, राय बरेली, अमेठी, प्रयागराज, वाराणसी असा हा रुट असणार आहे. जे मतदारसंघ मागण्यात येणार आहेत, त्यातूनच ही यात्रा नेण्याचा प्रयत्न काँग्रेसने केलेला आहे. एकप्रकारे सपाला ही लॉटरीच लागली आहे. यामुळे सपा काँग्रेसला ते मागतील त्या जागा सोडते की त्यातही आडकाठी करते यावरून युपीतील राजकारण तापणार आहे.