जैसलमेर : भाजपचे लोक देशातील लोकशाही कमजोर करीत आहेत. देशातील जनता हे सहन करणार नाही, अशा शब्दांत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी रविवारी भाजपवर हल्लाबोल केला. तथापि, भाजपमध्येच गटबाजी उफाळून आली असल्याचा दावाही गेहलोत यांनी केला आहे.मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आमदारांना पत्र लिहून लोकशाही वाचविण्याचे आवाहन केले आहे. यात म्हटले आहे की, माझी आपल्याला विनंती आहे की, आपण जनतेचा आवाज ऐकावा. आपण कोणत्याही पक्षाचे आमदार असोत, आपण लोकांच्या भावना समजून घ्या. मला विश्वास आहे की, राज्याचे व्यापक हित समोर ठेवून आमदार सत्याला साथ देतील. भाजपच्या विधिमंडळ पक्षाची मंगळवारी बैठक१४ आॅगस्टपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक ११ आॅगस्ट रोजी जयपूरमध्ये होणार आहे. विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांनी याबाबत भाजपच्या आमदारांना एक पत्र पाठविले आहे. ११ रोजी ४ वाजता जयपूरच्या हॉटेल क्राऊन प्लाझा येथे उपस्थित राहण्यास सांगितले आहे.