नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय मानक संस्था ‘स्टँडर्ड अँड पुअर्स’ने (एस अँड पी) भारताच्या सार्वभौम मानांकनात वाढ करण्यास पुन्हा एकदा नकार दिला आहे. शुक्रवारी जारी केलेल्या अहवालात एसअँडपीने भारताचे ‘बीबीबी-मायनस’ हे मानांकन कायम ठेवले असून, दृष्टीकोन ‘स्थिर’ ठेवला आहे. आठवडाभरापूर्वी मूडीजने भारताच्या मानांकनात वाढ केली होती. मूडीजने भारताचे मानांकन बीएए ३ वरून बीएए २ केले होते. त्यानुसार, एसअँडपीकडूनही मानांकन वाढविले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. तथापि, एस अँड पीने ही अपेक्षा फोल ठरविली आहे.‘एस अँड पी ग्लोबल रेटिंगज’ने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की, आम्ही भारताला दिलेल्या ‘स्थिर’ दृष्टीकोनाचा अर्थ असा आहे की, येत्या दोन वर्षांत भारताची वृद्धी मजबूत राहील. भारत आपले विदेशी खाते मजबूत ठेवील, तसेच वित्तीय तूटही आमच्या अपेक्षेप्रमाणे राहील.आॅक्टोबर २0१७मध्ये एस अँड पीने जारी केलेल्या अहवालात म्हटले होते की, मानांकनात वाढ करण्यासाठी भारताला आपली वित्तीय स्थिती सुधारणे आवश्यक आहे. भारताचे सार्वभौम मानांकन आम्ही नीचांकी गुंतवणूक दर्जा आणि स्थिर दृष्टीकोनासह ‘जैसे थे’ ठेवीत आहोत.मूडीज आणि एसअँडपी यांच्यानंतर आता फिच या आंतरराष्ट्रीय मानक संस्थेचा अहवाल येणे बाकी आहे. फिचकडून भारताला कोणते मानांकन मिळते याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.
भारताचे मानांकन वाढविण्यास ‘स्टँडर्ड अँड पुअर्स’चा नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 4:31 AM