स्थायी समिती अध्यक्षपदावरून आघाडीत बिघाडी ?
By admin | Published: February 18, 2015 12:13 AM
पुणे : महापालिकेच्या पंचवार्षिक कारभारातील स्थायी समितीचे अध्यक्षपद एक वर्ष काँग्रेसला देण्याचे ठरले होते. त्यानुसार काँग्रेसने यंदाच्या चौथ्या वर्षांतील स्थायी समिती अध्यक्षपदाचा दावा केला आहे. मात्र, राष्ट्रवादी हे पद देण्यासाठी अद्याप राजी नसून, चौथ्याऐवजी पाचवे वर्षे देण्याचा विचार सुरू आहे. त्यावरून सत्ताधारी आघाडीत बिघाडी निर्माण होण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या निवडणुका ...
पुणे : महापालिकेच्या पंचवार्षिक कारभारातील स्थायी समितीचे अध्यक्षपद एक वर्ष काँग्रेसला देण्याचे ठरले होते. त्यानुसार काँग्रेसने यंदाच्या चौथ्या वर्षांतील स्थायी समिती अध्यक्षपदाचा दावा केला आहे. मात्र, राष्ट्रवादी हे पद देण्यासाठी अद्याप राजी नसून, चौथ्याऐवजी पाचवे वर्षे देण्याचा विचार सुरू आहे. त्यावरून सत्ताधारी आघाडीत बिघाडी निर्माण होण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या निवडणुका दोन वर्षांवर आल्या आहेत. सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये विविध विषयांवरुन कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. आगामी अर्थसंकल्पात मिळकत करात १० टक्के व व्यावसायिक पाणीपीत ५० टक्के वाढ करण्याचा निर्णय नुकताच झाला. त्यावेळी काँग्रेसच्या नगरसेवकांनी करवाढीला विरोध केला. त्यामुळे राष्ट्रवादीवर भाजपला बरोबर घेण्याची नामुष्की ओढावली होती. दोन्ही पक्ष सत्तेत असूनही विविध विषयांवरून परस्पर विरोधी भूमिका घेतली जाते. सत्तेत असूनही काँग्रेसकडे विरोधी पक्षनेते पद आहे. त्यामुळे अनेकदा भाजप, शिवसेना व मनसे या विरोधी पक्षऐवजी काँग्रेसकडून राष्ट्रवादीची कोंडी करण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळे सावध भूमिका म्हणून स्थायी समिती पद चौथ्या ऐवजी पाचव्या वर्षी देण्याचा विचार राष्ट्रवादींच्या पदाधिका-यांचा सुरू आहे. पुर्वानुभवाचा धसका... गेल्या पंचवार्षिक निवडणुकीतही महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता होती. त्यावेळी राष्ट्रवादीने आघाडीच्या सुत्रानुसार चौथ्या वर्षीचे स्थायी समिती अध्यक्षपद काँग्रेसला दिले होते. त्यावेळी काँग्रेसचे विद्यमान विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे हे स्थायी समिती अध्यक्ष झाले होते. त्यानंतर पाचवे व शेवटच्या वर्षी हे पद पुन्हा राष्ट्रवादीकडे अपेक्षित होते. मात्र, काँग्रेसच्या तत्कालीन पदाधिका-यांनी कुरघोडी करीत पाचव्या वर्षी पुन्हा अध्यक्षपदाची उमेदवारी भरून राष्ट्रवादीची कोंडी केली होती. त्यावेळी राष्ट्रवादी व काँग्रेसचे एकमत होवू न शकल्याने ऐनवेळी भाजपचे गणेश बिडकर यांना संधी मिळाली होती. हा पूर्वानुभव असल्याने काँग्रेसला चौथ्या वर्षी अध्यक्षपद देण्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी सावध पवित्रा घेतल्याची चर्चा आहे. -------------स्थायी सदस्यांची आज निवड...महापालिकेतील स्थायी समितीच्या १६ सदस्यांपैैकी ८ जणांची मुदत २८ फेब्रुवारीला संपत आहे. त्यामुळे नवीन आठ सदस्यांसाठी भाजपचे ३, काँग्रेस २, राष्ट्रवादी, शिवसेना व मनसेचा प्रत्येकी एक सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. प्रत्येक राजकीय पक्षाकडून बंद पाकिटातून सदस्यांची नावे मुख्यसभेत उद्या (बुधवारी) देण्यात येणार आहेत. त्यामधून एकाची स्थायी समिती अध्यक्षपदी निवड होणार असल्याने त्याविषयी उत्सुकता आहे. ---------------------------