ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ - नोटाबंदीच्या मुद्यावरून संसदेचे हिवाळी अधिवेशन तापलेलेच आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी गोंधळ घातला असून राज्यसभेचे कामकाज आज दुपारपर्यंत तर लोकसभेचे कामकाज सोमवारपर्यंत स्थगित तहकूब करण्यात आले.
सरकार चर्चेसाठी तयार आहे, मात्र विरोधकांनी कामकाज होऊ द्यावे अशी भूमिका सत्ताधारी पक्षाने मांडली, मात्र त्यानंतरही विरोधकांचा गोंधळ सुरूच राहिल्याने शुक्रवारी राज्यसभेचे कामकाज तीनदा तहकूब करण्यात आले तर लोकसबा सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आली.
नोटाबंदीमुळे नऊ दिवसांपासून सामान्य जनता हैराण झाली आहे. राष्ट्राला उद्देशून ८ तारखेला ज्यांनी या निर्णयाची घोषणा केली ते (पंतप्रधान) आहेत कुठे? ते स्वत: सभागृहात येत नाहीत, आमचे म्हणणे ऐकत नाहीत, तोपर्यंत सभागृहाचे कामकाज आम्ही चालू देणार नाही, असा पवित्रा काँग्रेस, तृणमूलसह तमाम विरोधी पक्षांनी घेतल्यामुळे राज्यसभेत गुरुवारीही कोणतेही कामकाज झाले नव्हते. तेच वातावरण संसदेत शुक्रवारीही कायम राहिलेले दिसले. तिस-या दिवसाचे कामकाज सुरू झाल्यावर विरोधकांनी गोंधल घालायला सुरूवात करत नोटाबंदीच्या निर्णयावर चर्चा तसेच मतदान घ्यावे अशी मागणी केली.
तसेच राज्यसभेतही विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. राज्यसभेतही नोटाबंदीवर चर्चेची मागणी विरोधकांनी लावून धरली. यामुळे राज्यसभेचे कामकाजही दुपारपर्यंत तीन वेळा तहकूब करावे लागले.